नाइटलाइफसाठी पहाटेपर्यंत मद्यपानास परवानगी द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 05:53 AM2020-02-17T05:53:28+5:302020-02-17T05:53:48+5:30
आहार संघटनेची मागणी
मुंबई : मुंबईत नाइटलाइफला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. नाइटलाइफ यशस्वी करण्यासाठी पहाटे साडेतीनपर्यंत मद्यपान करण्याची परवानगी द्या, अशी मागणी आहार संघटनेने केली आहे.
याबाबत आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, रात्री एक-दोन वाजता कोणी कपडे खरेदी किंवा केवळ खाण्यासाठी बाहेर पडणार नाही. या वेळेत सर्वजण मनोरंजन करण्यासाठी बाहेर पडतील. खाण्यासह मद्यपानही करतील, पण मद्यपान करण्याची मर्यादा १.३० पर्यंतच आहे, तर नाइटलाइफ पहाटे पाचपर्यंत सुरू राहते. मद्यपान करण्याची मर्यादा १.३० वरून ३.३० पर्यंत वाढवायला हवी, असे त्यांनी सांगितले, तसेच हार्ड लिकरची वयोमर्यादा २५ वरून २१ वर्षे करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. उत्पादन शुल्क विभागाने परवाना फीमध्ये वाढ केल्यामुळे लहान रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली आहे. रेस्टॉरंट चालकांना व्यवसायात झालेली घट आणि महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या वर्षी परवाना शुल्क वाढवू नये, असे शिवानंद शेट्टी म्हणाले.