Join us

अनाथांना रिमांड होममध्ये राहण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:06 AM

नीलम गोऱ्हे; कोविडच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविभागाला सूचनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत ...

नीलम गोऱ्हे; कोविडच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविभागाला सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर २१ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाही अनुरक्षण गृहात (रिमांड होम) राहण्याची मुभा द्यावी, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिला व बाल विकास विभागाला पत्राद्वारे केली.

वयाची २१ वर्षे पूर्ण करणाऱ्या मुला-मुलींना अनुरक्षणगृहात राहण्याची मुभा नसते. वयाच्या १८ व्या वर्षांनंतर त्यांना अनाथाश्रमातून बाहेर पडावे लागते. अनाथ मुले-मुली परिस्थितीशी संघर्ष करत, कठीण परिस्थितीतूनही बाहेर पडून चांगली नाेकरी आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह चालवत असतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या मुलांनी रोजगार गमावला आहे किंवा जे गरजू आहेत अशा २१ वर्षांपुढील अनाथ मुलांना अनुरक्षणगृहात राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच, लॉकडाऊनमध्ये कामगारांना, गरजूंना आर्थिक आणि धान्याची मदत करण्यात आली. याच धर्तीवर अनुरक्षणगृहातून बाहेर पडलेल्या मुलांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत यथायोग्य आर्थिक व धान्याची मदत देण्यासाठी त्वरित निर्णय घ्यावा, अशा सूचना उपसभापतींनी केल्या.

या मुलांकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्नधान्य मिळत नाही. त्यामुळे या तरुणांना रेशनकार्ड द्यावे. अनाथ ओळखपत्र असलेल्या मुलांना थेट मोफत रेशन देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्यात येरवडा अनुरक्षणगृहात शंभर मुलांच्या राहण्याची व्यवस्था आहे. मात्र, सध्या तिथे १८ मुले राहतात, तर औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर येथील प्रत्येक अनुरक्षणगृहाची शंभर मुलांची क्षमता आहे. या ठिकाणीही क्षमतेपेक्षा कमी मुले असल्याचे गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.

.....................