Join us

नाविकांना लोकल प्रवासाची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकलने प्रवास करू दिला जात नसल्याने नाविक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. त्यामुळे तत्काळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लोकलने प्रवास करू दिला जात नसल्याने नाविक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. त्यामुळे तत्काळ लोकल प्रवासाची मुभा देऊन आमचा रोजगार वाचवा, असे साकडे नाविकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे.

मुंबईसह राज्यातील बहुतांश नाविक कर्मचारी गेल्या दीड वर्षांपासून नोकरीपासून वंचित आहेत. कोरोनाबाबतचे आंतरराष्ट्रीय निर्बंध शिथील झाल्यानंतर लसीकरणाअभावी भारतीय नाविकांना नोकरीवर रुजू होता आले नाही. आता लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लोकल प्रवासाला परवानगी नसल्याने नवा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हातचा रोजगार गमावण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन नाविकांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली.

ऑल इंडिया सीफेरर्स युनियनचे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मुंबईतील बहुतांश नाविकांचे लसीकरण पूर्ण होत आले आहे. त्यामुळे शिपींग कंपन्यांनी कामगारांना हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत. नाविकांना जहाजावर रुजू होण्यापूर्वी वैद्यकीय प्रक्रिया (मेडिकल) पार पाडावी लागते. त्यासाठी वारंवार कंपनी कार्यालयाला भेट द्यावी लागते. ही सर्व प्रक्रिया विहीत वेळेत पूर्ण न केल्यास कंपनी करारनामा देत नाही. परंतु, लोकल प्रवासाची मुभा नसल्याने जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार, नाविकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. मात्र, इतर फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे आम्हाला लोकल प्रवास करू दिला जात नाही. नौवहन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक नाविक कर्मचाऱ्याला केंद्र सरकारकडून एसआयडी (सीफेअर्स आयडेंटिटी डॉक्युमेंट) दिले जाते. बायोमेट्रिक पद्धतीचे हे कार्ड केंद्र सरकारचे अधिकृत ओळखपत्र आहे. त्याशिवाय आमच्याकडे इंडियन सीडीसी (चलत उन्मोचन प्रमाणपत्र) असते. इतके अधिकृत पुरावे असतानाही नाविकांना लोकलचे तिकीट देण्यास नकार दिला जातो, हे चुकीचे आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून देण्यासाठी त्यांना पत्र लिहिल्याचे सांगळे यांनी सांगितले.

* नोकरी गमावण्याची वेळ

आधीच एक-दीड वर्षापासून आम्ही घरी बसलो आहेत. आता कंपनीकडून रूजू होण्याच्या सूचना मिळाल्या असताना प्रवासाच्या अडथळ्यांमुळे नाविकांचा रोजगार धोक्यात आला आहे. एकीकडे देशात आणि राज्यात बेरोजगारांचे प्रमाण वाढत असताना हातच्या नोकऱ्या गमवाव्या लागण्यासारखे दुर्दैव नाही. मुख्यमंत्र्यांनी आमच्या समस्यांकडे लक्ष देऊन नाविकांसाठी लोकल प्रवास तत्काळ खुला करावा, अशी मागणी सांगळे यांनी केली.

.........................................................