लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होत असून, बहुतांश ठिकाणांवरील बंधने उठविण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त प्रार्थनेस्थळेही खुली करण्यात आली असून, बहुतांश प्रार्थनास्थळांलगतची दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या दोन्ही प्रवेशद्वारांच्या आत असलेली दुकाने अद्यापही खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून, संबंधितांना आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून येथील दुकाने बंद आहेत. आता मंदिर सुरू झाले आहे. परिणामी सिद्धिविनायक मंदिराच्या दोन्ही प्रवेशद्वारांच्या आत असलेली दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, येथील दुकानांची संख्या सुमारे ७० ते ८० च्या घरात आहे आणि या सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.