Join us

दोन डोस घेतलेल्यांना विसर्जनास येण्याची परवानगी द्या- ॲड. नरेश दहिबावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 10:14 AM

पालिकेने समन्वय समितीचे म्हणणे ऐकावे, कृत्रिम तलावांत सर्व मूर्तींचे विसर्जन अशक्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  राज्य सरकारने गणेशोत्सची नियमावली जाहीर केली. या नियमावलीत अंशतः शिथिलता मिळण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला. त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेने आमचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या कार्यकर्त्यांना मुंबईतील सर्व ८४ चौपाट्यांवर विसर्जन करण्याची परवानगी द्यावी, असे मत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.मंडळांची गणेशोत्सवाची तयारी कशी सुरू आहे? राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर आला व मोठी जीवितहानी झाली. यामुळे गणेशोत्सव मंडळ आजही कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात मदतकार्य करत आहेत. मदतकार्य संपल्यावरच बैठका घेऊन गणेशोत्सवाची तयारी करण्यात येईल. त्यामुळे सध्यातरी मदत कार्य व लसीकरणावर भर दिला जात आहे.पालिकेकडून काय अपेक्षा आहेत? यंदा कोरोनाचे सावट असले तरी देखील गेल्यावर्षीप्रमाणे कठोर नियम मंडळांवर लादु नयेत. मंडळांना आरोग्यविषयक जाहिरातींसोबतच व्यवसायिक जाहिरातींसाठी देखील परवानगी द्यावी. वाहतुकीला अडचण निर्माण होणार नाही, असे पालिकेचे मंडपाबाबत धोरण आहे. त्याला उच्च न्यायालयाने ही परवानगी आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळ त्यांच्या परीने मंडप उभारतील. गेल्यावर्षी कृत्रिम तलावांमध्ये १२ ते १६ तास उलटूनही नीट विसर्जन झाले नाही. त्यामुळे लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या कार्यकर्त्यांना मुंबईतील सर्व ८४ चौपाट्यांवर विसर्जन करण्याची परवानगी द्यावी. मंडळांसाठी जाहिराती महत्त्वाच्या का आहेत.गेल्यावर्षी वर्गणी न जमल्याने व जाहिराती न आल्याने अनेक मंडळांकडे पैसे उरले नाहीत. कोणताही उत्सव पैशांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे यंदा व्यावसायिक जाहिरातींना परवानगी दिल्यास मंडळांना आधार मिळू शकतो. मंडळांना रस्त्याच्या दुतर्फा जाहिरातींसाठी परवानगी देण्यात यावी कारण गणेशोत्सव मंडळ वर्षभर समाजोपयोगी कार्यक्रम राबवतात. सरकारने मदतीचे आवाहन करताच गणेशोत्सव मंडळ सर्वात आधी मदतीसाठी पुढे येतात. कोरोनाच्या काळात व पूरपरिस्थितीत मंडळांनी कशाप्रकारे मदत केली.सुरुवातीपसूनच कोणताही अनुभव नसताना मंडळांच्या कृती दलाच्या ४०० कार्यकर्त्यांनी १ हजार हून अधिक रुग्णांना सेवा दिली. याची नोंद राज्यपालांनी घेतली व त्या कार्यकर्त्यांना सन्मानित केले. पूर परिस्थितीतही मंडळांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देखील अनेक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मदतीसाठी तयार आहेत. लसीकरणासाठी गणेशोत्सव मंडळांना लसीकरण केंद्रे उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.मूर्तिकारांसाठी सरकारकडून काय अपेक्षा आहेत.मुंबईत अंदाजे १२ हजार मंडळांपैकी ४ हजार मंडळ उंच मूर्तींसाठी प्रसिद्ध आहेत. या मूर्तीची किंमत १ लाख रुपये आहे. उंच मूर्तीमुळे दरवर्षी ४० कोटींची उलाढाल होते. सर्व मूर्तीकार हे मराठी आहेत. मागील वर्षी अनेक मुर्त्या रद्द झाल्याने त्यांना उत्पन्नाचे साधन राहिले नाही. त्यात गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा आल्याने त्यांचे उत्पन्न देखील घटले. त्यामुळे आपली कला व संस्कृती जपणाऱ्या मूर्तिकारांना देखील तीन ते चार लाखांची मदत जाहीर करावी.