मुंबई- कोरोनाचे संकट दूर होऊन यंदा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा केला गेला. आता मुंबई सह राज्यात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
यंदा सोमवार दि,२६ सप्टेंबर ते मंगळवार दि,४ ऑक्टोबर पर्यंत या नऊ दिवस मुंबई सह राज्यात ठिकठिकाणी नवरात्रौत्सवात गरबा-दांडीयाचे जल्लोषात आयोजन केले जाणार आहे. सर्व जाती धर्माचे नागरिक कायद्याचे पालन करत नवरात्रौत्सव उत्साहात साजरा करतात.
गुजरात,राजस्थान व इतर राज्यात जशी नऊ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गरबा-दांडीयाला परवानगी दिली जाते. त्याप्रमाणे नागरिकांना हा उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी व गरबा खेळण्यासाठी या नऊ दिवसांत १२ वाजेपर्यंत मुंबईसह राज्यात परवानगी द्यावी अशी विनंती मागाठाणे विधानसभा मतदार संघाचे आमदार व विभाग क्रमांक १ चे विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी आज एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. आपल्या विनंतीला मान देऊन आपण सकारात्मक भूमिका घेत योग्य निर्णय द्यावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.