महापालिकेचा केंद्राला प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तिसऱ्या संभाव्य कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर लहानग्यांवर कोरोना लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू झाली आहे. त्या धर्तीवर आता मुंबई महानगरपालिकेने केंद्र सरकारकडेही लहानग्यांवर कोव्हॅक्सिन लसीची ट्रायल सुरू करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पाठवला आहे. याविषयी अद्याप केंद्र सरकारकडून अंतिम निर्णय आलेला नाही.
लहानग्यांवर कोव्हॅक्सिन ट्रायलविषयी भारत बायोटेक कंपनीकडून संमती मिळेल, परंतु त्याकरिता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने हिरवा कंदील दाखवण्याची प्रतीक्षा आहे. या प्रस्तावांतर्गत १२ ते १८ वयोगटातील लहानग्यांवर कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल करावी, असे म्हटले आहे.
याविषयी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, केंद्राकडे हा प्रस्ताव पाठवला आहे, याविषयी लवकरच परवानगी मिळेल, अशी आशा आहे. केंद्राच्या संमत्तीनंतर एथिकल समितीकडूनही याविषयी मान्यता घेण्यात येईल, त्यानंतरच अशाप्रकारच्या क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात येतील. काही लसीकरण कंपन्यांनी अशा ट्रायलसाठी तयारी दर्शविल्याने त्या धर्तीवर पालिकेकडून केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. सध्या या ट्रायलसाठी दोन वैद्यकीय महाविद्यालयांची नियुक्ती करण्याचा विचार आहे, परंतु ही ट्रायल संपूर्णतः इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात येणार आहे.
तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून व त्यात लहानग्यांना संभवणारा संसर्गाचा धोका ओळखून देशभरातील राज्य शासन किंवा स्थानिक यंत्रणांकडून वेळीच खबरदारी घेऊन आराेग्य व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पटनामध्येही लहानग्यांच्या लसीच्या क्लिनिकल ट्रायलला संमती देण्यात आली आहे. तसेच, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्यावतीने लहानग्यांच्या लसीची क्लिनिकल ट्रायल लवकरच सुरू होणार आहे.
......................................