Join us

सर्वांच्या साथीने सत्तेचे शिवधनुष्य हाती घेत आहे - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 7:20 AM

तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि साथीने मी हे सत्तेचे शिवधनुष्य हाती घेत आहे. माझे सरकार राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे, त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करेल, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर जाहीर केले.

मुंबई : तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि साथीने मी हे सत्तेचे शिवधनुष्य हाती घेत आहे. माझे सरकार राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे, त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करेल, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर जाहीर केले. आमचे सरकार कोणाशीही सुडाने वागणार नाही, अशीही त्यांनी ग्वाही दिली, पण कोणी आडवे आले तर त्यांना सरळ करू, असा इशाराही त्यांनी दिला.ट्रायडन्ट हॉटेलात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससह अन्य मित्रपक्षाच्या, तसेच आमदारांची एकत्रित बैठक झाली. त्यात या सर्वांची मिळून ह्यमहाराष्ट्र विकास आघाडीह्ण स्थापन करण्याचे व या आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्याचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर, तिन्ही पक्षांच्या आमदारांपुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांच्याशी ३० वर्षे सोबत केली, त्यांनी अविश्वास दाखविला, पण ज्यांचा नेहमी विरोध केला, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, याचे सखेद आश्चर्य वाटते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला मारला. ह्यमातोश्रीह्णची पायरीही कधी न उतरलेले आता इतरांच्या पायऱ्या झिजवत आहेत, या फडणवीस यांच्या टीकेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, आम्ही मैदानातील माणसे आहोत, मैदान कसे मारायचे, कसे गाजवायचे हे आम्हाला पूर्ण ठाऊक आहे.उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला खूप काटे असतात, खिळे असतात, याची मला पूर्ण जाणीव आहे. जाणारे मुख्यमंत्री या खुर्चीला आणखी खिळे ठोकून जातात, पण हे सर्व खिळे ठोकून सपाट करणारा मजबूत हातोडा आमच्याकडे आहे. आपण सर्वांनी कोणतीही हमरीतुमरी न करता एक कुटुंब म्हणून एकदिलाने सरकार चालवायचे आहे. राज्यातील प्रत्येक माणसाला हे माझे सरकार आहे, असा विश्वास देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याची जाणीवही त्यांनी आघाडीतील सर्व पक्षांच्या आमदारांना दिली.देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य मित्रपक्षांनी ह्यमहाराष्ट्र विकास आघाडीह्णची अधिकृत स्थापना केली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची या आघाडीच्या नेतेपदी एकमताने निवड केली. ही बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा औपचारिक दावा सादर केला. येत्या १ डिसेंबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल, असेही जाहीर करण्यात आले.आजच्या संविधान दिनी ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानणाराही ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. या आघाडीने सरकार स्थापनेसाठी एकमताने तयार केलेल्या किमान समान कार्यक्रमाचे ठळक मुद्देही यावेळी विषद करण्यात आले. आघाडीचे सरकार भारतीय संविधानाचे प्रामाणिकपणे पालन करेल आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या कल्याणासाठी काम करेल, अशी ग्वाहीही देण्यात आली. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या किमान समान कार्यक्रमाला संमती दिली आहे.

सोनिया गांधींचे आभार : आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेसचे अन्य नेते यांचे आभार मानले. नंतर त्यांनी सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख करून, आपण त्यांचेही आभार मानतो, असे सांगितले, तेव्हा तिन्ही पक्षांच्या आमदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख करून त्यांना आदरांजली वाहिली.मोदींना नक्कीच भेटेन : मोठ्या भावाला दिल्लीत जाऊन नक्कीच भेटेन, असे उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता सांगितले. त्यांनीच माझा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला होता, असे ते म्हणाले. संजयराऊ त यांनीही उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला पंतप्रधान व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना नक्की निमंत्रण दिले जाईल, असे सांगितले.अजित पवार अनुपस्थित : उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे अजित पवार हेही या बैठकीला येणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांना आणायला राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते गेले आहेत, अशी चर्चा होती. पण ते बैठकीला आलेच नाहीत. ते येणार नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. या बैठकीत छगन भुजबळ यांचेही भाषण झाले. त्यांनी भाषणात अजित पवार यांचा आवर्जून उल्लेख केला. अजित पवार यांना पुन्हा आणणे गरजेचे आहे. आपल्याला, या महाविकास आघाडीला अजित पवार यांची गरज आहे.गेले साहेबांच्या भेटीला...: ट्रायडंटवरील बैठक आटोपताच उद्धव ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे तिघे राजभवनाकडे रवाना झाले. तिथे त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तेथून निघालेले शरद पवार मात्र आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले. तिथे गेल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने अजित पवार तिथे पोहोचले. तिथे अनेक पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी होते. त्यांना टाळण्यासाठी अजित पवार कारमधून उतरल्यानंतर धावतच शरद पवार यांच्या घरात शिरले.बाळासाहेबांच्या आठवणींना पवार यांनी दिला उजाळाराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्रायडंट हॉटेलातील आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. आज बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते, असे सांगून ते म्हणाले की, मी, जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब अनेकदा एकमेकांवर टीका करायचो आणि सायंकाळी एकत्र बसायचो, तेव्हा मीनावहिनी आम्हाला चांगले पदार्थ करून खाऊ घालायच्या.जातपात न पाहता लहान माणसांमधून नेतृत्व कसे घडवावे, याचा आदर्श बाळासाहेबांनी निर्माण केला हे त्यांचे मोठेपण होते, अशी प्रशंसा करताना पवार यांनी चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार, खासदार, मंत्रिपद बाळासाहेबांमुळेच मिळाले, याचा आवर्जून उल्लेख केला.उद्धव ठाकरे म्हणाले की, मला बाळासाहेबांची आठवण येत नाही का, असे अनेक जण विचारतात. तेव्हा मी सांगतो की, संघर्षाच्या वेळेपेक्षा जिंकतो, तेव्हा आनंदाच्या क्षणी त्यांची आठवण नक्कीच होते. तशीच ती आता होत आहे. सुप्रिया सुळे यांची राज्यसभेवर पहिल्यांदा बिनविरोध निवड झाली पाहिजे, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. त्यानुसारच झाले. आजचा प्रसंग ही परतफेड नाही, तर हे कौटुंबिक संबंध आहेत, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019