Join us

दिवाळीच्या तोंडावर स्वप्नातील घर खरेदीची लगबग; विक्रीत तब्बल १०९ टक्क्यांनी वाढ; परवडणारी घरे बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 05:57 IST

Home : सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत मुंबईत एकूण १५ हजार ९४२ सदनिकांची विक्री झाली. ही विक्री गेल्यावर्षीच्या तुलनेने १०९ टक्क्यांनी वाढली असून हा देशातील सर्वाधिक आकडा आहे.

- ओकार गावंड

मुंबई : मुंबईत दिवसाला सरासरी ३५० ते ४०० घरांच्या खरेदीची नोंद होत आहे. यंदा नवरात्रीतदेखील मुंबईत घर खरेदीने अडीच हजारांचा टप्पा ओलांडला. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या चौथ्या तिमाहीत देशात घर खरेदी १५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवाळीत घर खरेदी वाढणार असून दिवाळी पाडवा तसेच अन्य मुहूर्तांवर घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता आहे.

सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत मुंबईत एकूण १५ हजार ९४२ सदनिकांची विक्री झाली. ही विक्री गेल्यावर्षीच्या तुलनेने १०९ टक्क्यांनी वाढली असून हा देशातील सर्वाधिक आकडा आहे. २०२१ च्या सुरुवातीला देशात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट झाली, तर प्रीमियम घरांच्या विक्रीत वाढ झाली.

भारतात यंदा सुरुवातीला ८० लाख ते १.५ कोटी किमतीच्या १३ हजार १३० घरांची विक्री झाली, तर ४० लाख ते ८० लाखदरम्यान किंमत असणाऱ्या ११ हजार ७६० घरांची विक्री झाली. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी ३६ टक्के प्रीमियम घरे विक्रीसाठी बाजारात आणली तर २० टक्के परवडणारी घरे बाजारात आणली.येत्या काळात सर्वसामान्यांसाठी जास्त प्रमाणात परवडणाऱ्या घरांची मागणी वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरूयंदा देशात एकूण घर विक्रीपैकी ३३ टक्के घरे मुंबई महानगरात विकण्यात आली. देशात नवीन घरे बाजारात विक्रीसाठी दाखल होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांनी वाढले आहे. तसेच घरांच्या किमती यंदा तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोरोनामुळे शहरांमधून मजुरांनी स्थलांतर केल्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामे मोठ्या प्रमाणात रखडली होती. आता पुन्हा ही कामे सुरू झाल्याने नवीन प्रकल्प व घरे विक्रीचे प्रमाण वाढणार आहे.

लसीकरणावर जास्तीत जास्त भर दिल्याने आता सामान्य नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्ताने पुन्हा एकदा घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे आर्थिक स्थितीतही सुधारणा होत आहे. आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांकडून बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाईल. या काळात परवडणाऱ्या व मिड-सेगमेंट घरांची विक्री जास्त होईल.- रोहित पोद्दार, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ

टॅग्स :सुंदर गृहनियोजन