Join us

आलोक कंसल यांनी मध्य रेल्वेच्या मान्सून तयारीच्या कामांचा आढावा घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:07 AM

मुंबई : आलोक कंसल यांनी नुकतीच आभासी बैठकीद्वारे मुंबई विभागातील मान्सूनच्या तयारीच्या कामांचा आढावा घेतला. नवीन आर.सी.सी. बॉक्स टाकून ...

मुंबई : आलोक कंसल यांनी नुकतीच आभासी बैठकीद्वारे मुंबई विभागातील मान्सूनच्या तयारीच्या कामांचा आढावा घेतला. नवीन आर.सी.सी. बॉक्स टाकून विद्यमान पुलाच्या जलवाहिनीच्या वाढीसंदर्भात पाण्याचा प्रवेश रोखणाऱ्या जोडांची व्यवस्था करण्यासाठी ड्रॉइंगची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी मुंबई विभागातील अधिकाऱ्यांना दिले. तसेच कटिंग्ज, बोगदे, पाण्याचे नाले आणि पावसाळ्यासंदर्भातील इतर बाबींच्या तपासणीसंदर्भात अनेक सूचना देण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या कुर्ला ते विद्याविहार स्थानकादरम्यान सूक्ष्म बोगद्याद्वारे १.८ मीटर व्यास आणि दोनशे मीटर लांबीचे पाच पाईप्स टाकले गेले आहेत. पनवेल आणि कर्जत, वडाळा आणि रावळी, टिळकनगर, बदलापूर आणि वांगणी दरम्यान विद्यमान पुलाला लागून आरसीसी बॉक्स टाकून जलमार्ग वाढविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मदतीने मायक्रो-टनेलिंगद्वारे सँडहर्स्ट रोड येथे १.८ मीटर व्यास आणि ४०० मीटर लांबीचा पाईप, मस्जीद स्थानक येथे १ मीटर व्यास आणि ७० मीटर लांबीच्या पाईपला सूक्ष्म बोगद्याद्वारे जमिनीखालून टाकण्यात आले आहे.

चिन्हांकित ठिकाणी पंपांची संख्या आणि क्षमता वाढविण्यात आली आहे. मोठ्या पाण्याचा प्रवाह त्वरित वाहून नेण्यासाठी, पावसाळ्याच्या काळात ट्रॅकवर पाणी राहू नये आणि रेल्वेची वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी हेवी ड्युटी पंप देण्याचीही रेल्वेने योजना आखली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पंपांची संख्या १०% वाढविली जाणार आहे.

कंसल यांनी रेल्वे बोर्डात २०१९ मध्ये केलेली घाटांची पाहणी

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे बोर्डात असताना २०१९ मध्ये घाटांची पाहणी केली असताना त्यांनी घाटातील असुरक्षित ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना सुचवल्या. यामध्ये दक्षिण-पूर्व घाटातील पठाराला कायम ठेवण्यासाठी काही ठिकाणी कॅनेडियन कुंपण घालणे, वायर नेट व स्टील बीममधून पडणाऱ्या दगडाला रोखणे, रुळांवर जास्त पाणी येऊ नये यासाठी नाल्याची भिंत उंचावणे इ. कामे सुरू आहेत.

पंपांच्या देखभाल व ब्रेकडाऊनकडे लक्ष

स्टँडबाय सप्लाय डीजी सेटची तपासणी, एएमएफ पॅनल व आपत्कालीन सर्किटचे कामकाज, विद्युत मालमत्ता, आऊटडोअर पॅनल्स, ओव्हरहेड लाईन्सच्या आसपासच्या झाडाच्या फांद्या छाटणे, केबल व बस बार कनेक्शनची तपासणी तापमान गनद्वारे करणे आणि गरम ब्लोअरने साफ करणे तसेच मुंबई विभागातील विविध ठिकाणच्या पंपांच्या देखभाल व ब्रेकडाऊनकडे लक्ष ठेवले जात आहे.

आरपीएफ कर्मचाऱ्यांकडून ड्रोनद्वारे मॉनिटरिंग

रेल्वे सुरक्षा दलाच्या क्विक रिएक्शन टीम आणि फ्लड रेस्क्यू टीमने एनडीआरएफकडून प्रशिक्षण घेतले आले. कोणत्याही परिस्थितीतील बचावासाठी ५ यांत्रिकीकृत बचाव नौका सामरिकरीत्या ठेवण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षाला वेळेवर माहिती मिळण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांकडून ड्रोनद्वारे मॉनिटरिंग करण्यात येईल.