मोठ्या रस्त्यांसोबत छोटे रस्तेही होणार सिमेंटचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:08 AM2021-09-12T04:08:03+5:302021-09-12T04:08:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील डांबरी रस्त्यांवर दर पावसाळ्यात पडणारे खड्डे लक्षात घेता मुंबई महापालिकेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील डांबरी रस्त्यांवर दर पावसाळ्यात पडणारे खड्डे लक्षात घेता मुंबई महापालिकेने यावर जालीम उपाय शोधला आहे. आता पालिका मोठ्या रस्त्यांसोबत सहा मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करणार आहे. तसा निर्णयच प्रशासनाने घेतला असून, आता कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे.
पावसाळा आला की मुंबई खड्ड्यात जाते. विशेषत: डांबरी आणि छोट्या रस्त्यांना याचा मोठा फटका बसतो. परिणामी, वाहनचालक आणि नागरिकांना देखील त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केले जातात. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी शीत डांबरमिश्रित खडीचा पुरवठा केला जातो. प्रत्येक विभागाला यासाठी दोन कोटी दिले जातात. मात्र, एवढे करूनही मुंबई खड्ड्यातच जाते. परिणामी, यावर कायमस्वरूपी उपाय योजना म्हणून मोठ्या रस्त्यांसोबत छोट्या सहा मीटर रुंद रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेने ९ एप्रिल ते ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील एकूण ३१ हजार ३९८ खड्डे बुजविले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे एक लाख ५६ हजार ९१० चौरस मीटर इतके होते. विशेषतः डांबरी रस्त्यांवर पावसाळी पाण्यामुळे खड्डे तयार होण्याची समस्या निर्माण होते, ही बाब लक्षात घेता यापुढे मोठ्या रस्त्यांसह ६ मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने अवलंबले असून, त्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
रस्त्यांवर खड्डे होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा आमंत्रित करून महापालिकेने कंत्राटदार नियुक्त केले आहे. हे कंत्राट द्विवार्षिक स्वरूपाचे असून, प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी, तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत.
प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीत असलेले रस्ते हे संबंधित नियुक्त कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादित वेळेत तसेच विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी कोणताही मोबदला/अधिदान दिले जात नाही. या अनुषंगाने यंदाचा विचार करता, महापालिकेतर्फे ९ एप्रिल ते ८ सप्टेंबर या कालावधीमध्ये खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.
- आतापर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध नियमित कामगारांमार्फत २२ हजार ८९७ खड्डे बुजविण्यात आले आहेत.
- बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ ४९ हजार ९१९ चौरस मीटर आहे.
- खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत ८ हजार ५०१ खड्डे बुजविण्यात आले.
- बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ १ लाख ६ हजार ९८५ चौरस मीटर आहे.