Eknath Khadse News: एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत जाणार, सूनबाई भाजपासोबतच राहणार

By मुकेश चव्हाण | Published: October 21, 2020 02:16 PM2020-10-21T14:16:15+5:302020-10-21T15:19:34+5:30

एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या आणि भाजपाच्या नेत्या रोहिणी खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Along with Eknath Khadse, daughter will also join NCP, Sunbai will stay with BJP? | Eknath Khadse News: एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत जाणार, सूनबाई भाजपासोबतच राहणार

Eknath Khadse News: एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत जाणार, सूनबाई भाजपासोबतच राहणार

googlenewsNext

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.

एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, गेली तीन साडे तीन दशके भाजपामध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याचे मला कळवलं आहे. ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच एकनाथ खडसे यांना मानणारे, त्यांचे पाठीराखे असलेले नेते आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे जयंत पाटील यांनी सांगितलं.

एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या आणि भाजपाच्या नेत्या रोहिणी खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे धुळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटीलही एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीत जाणार जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्या खासदार आणि एकनाथ खडसेंच्या सून खासदार रक्षा खडसे भाजपा सोडणार नाहीत, अशी माहिती स्वत: एकनाथ खडसेंनी राजीनाम्यानंतर दिली आहे. तसेच भुसावळचे आमदार संजय सावकारे हे खडसे समर्थक असले तरी ते देखील सध्या भाजपातच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 कधी होणार पक्ष प्रवेश?

मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. 

खडसेंची राजकीय कारकीर्द

एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. परंतु मुंडे यांच्या निधनानंतर खडसेंना प्रदेश भाजपामध्ये डावलण्यात आल्याचा आरोप त्यांचे समर्थक करतात. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलं होतं. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. 

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

Web Title: Along with Eknath Khadse, daughter will also join NCP, Sunbai will stay with BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.