Join us

भाजीपाल्यासोबत डाळही आवाक्याबाहेर मसूरच्या डाळीने भूक भागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाच्या काळात इंधनासोबतच खाद्यपदार्थांचे भाव वाढल्याने, सामान्य माणसाला मोठा त्रास सहन करावा लागला. गेल्या काही दिवसांमध्ये कडधान्य, ...

मुंबई : कोरोनाच्या काळात इंधनासोबतच खाद्यपदार्थांचे भाव वाढल्याने, सामान्य माणसाला मोठा त्रास सहन करावा लागला. गेल्या काही दिवसांमध्ये कडधान्य, डाळी, खाद्यतेल, सिलिंडर, पेट्रोल व डिझेल यांचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच महागाईचा भडका उडाल्याने, आता नेमके जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उपस्थित होत आहे.

अनेक घरांमध्ये काटकसर व्हावी, म्हणून महागड्या डाळी व पालेभाज्या खाणे कमी झाले आहे.

येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक सण आहेत, या सणांच्या निमित्त अनेक घरांमध्ये खाद्यपदार्थ बनविले जातात. मात्र, यंदा हे सणासुदीचे दिवस नागरिकांना महागाईच्या आगीत काढावे लागणार आहेत. या महागाईमुळे घराघरातील नागरिक मोठ्या चिंतेत आहेत. येत्या काळात भाजीपाल्यांचे व कडधान्यांचे दर अजून भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या सणासुदीच्या काळात घरांमध्ये पंचपक्वान्न व गोड पदार्थ बनविण्यासाठी सर्वसामान्यांना खिसा रिकामा करावा लागणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

डाळींचे दर (प्रतिकिलो)

हरभरा ७०

तूर १००

मूग १००

उडीद ११०

मसूर ७०

मटकी ११०

भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)

बटाटा २५

कांदा ३०

टोमॅटो २५

काकडी ३०

कोथिंबीर १५

पालक १०

मेथी १५

दोडके ३०

लिंबू २ रु. नग

गवार ४०

म्हणून डाळ महागली

कोरोनामुळे यंदा डाळींची लागवड कमी झाली. त्याचप्रमाणे, इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक खर्चही वाढला. त्यात अतिवृष्टीचा फटका डाळ उत्पादक शेतकऱ्यांना बसला. परिणामी, शहरांमधील जुना डाळींचा साठा संपूनही नवीन डाळींची आवक वाढली नाही. त्यामुळे आता ज्या डाळी उपलब्ध आहेत, त्या डाळींचे भाव वाढविले गेले आहेत.

म्हणून भाजीपाला कडाडला

यंदा कोरोनामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड कमी केल्यामुळे बाजारात आवक कमी झाली. त्याचप्रमाणे वाहतूक खर्चही वाढला आहे, तसेच अतिवृष्टीमुळेही भाजीपाल्यांच्या पिकांवर परिणाम झाला. यामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले.

सर्वसामान्यांचे हाल

महागाई वाढली असली, तरी सण साजरे करावे लागणारच, परंतु या डाळींच्या आणि भाजीपाल्यांच्या दरांवर नियंत्रण आणायला हवे, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर हे दर गेले, तर आम्ही नेमके जगायचे तरी कसे?

- स्वाती शिरोळे, गृहिणी.

कोरोनाच्या काळात पगार निम्मा झाला आहे, परंतु महागाई मात्र वाढत चालली आहे. यासाठी घरात खाण्या-पिण्यातील गोष्टींवर काटकसर केली जात आहे. ही महागाई अजून किती रडविणार आहे, याचा अंदाज नाही.

- सुनेत्रा पांचाळ, गृहिणी.