भाजप-शिंदे गटाचं ठरलं! सर्व निवडणुका सोबतच; शाह यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 05:48 AM2023-06-06T05:48:00+5:302023-06-06T05:50:44+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र लढवणार आणि बहुमताने जिंकणार, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे यांनी ट्वीट करून हा दावा केला आहे.
राज्यात आगामी सर्व निवडणुका ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो, त्या शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय अमित शहांबरोबर झालेल्या बैठकीत घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे. रखडलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार, असा दावा त्यांनी या ट्वीटमध्ये केला आहे.
रणनीतीही एकत्रित ठरविणार : फडणवीस
महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) सर्व निवडणुका एकत्रित लढण्याचे ठरवल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली आहे. आम्ही फक्त निवडणुकाच एकत्रित लढणार नाही तर त्यासाठी रणनीतीही एकत्रित तयार केली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांत जिल्हा स्तरापासून तालुका स्तरापर्यंत समन्वय घडवला जाणार असल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.