मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालयांसह मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमध्ये ७ ठिकाणी छापेमारीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ईडीने अधिक तपास सुरू केला आहे. यादरम्यान काही महत्त्वपूर्ण पुरावेही ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे परब यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे आणखीन काही नेते ईडीच्या रडारवर असून, येत्या काही दिवसांत त्यांनाही ईडीच्या चौकशीला तोंड द्यावे लागणार असल्याची माहिती ईडी सूत्राकडून मिळत आहे.
परब यांचे निकटवर्तीय संजय कदम आणि परब असोसिएटवरील प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत, दापोली येथे एका राजकीय नेत्याने २०१७ मध्ये जमीन खरेदी केली. १ कोटीच्या मोबदल्यात ही जमीन देण्यात आली होती. पुढे याच ठिकाणी आलिशान रिसॉर्ट उभे राहिले. राजकीय नेत्याच्या नावे खरेदी झालेली जमीन रिसॉर्ट पूर्ण झाल्यावर मुंबईतील केबल व्यावसायिकाला विकण्यात आली; परंतु फक्त स्टॅम्प ड्युटी भरली गेल्याचे तपासात समोर येताच परब हे प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आले होते.
अनिल परब यांची पुन्हा चौकशी होणार का?दापोलीतील रिसॉर्टसंबंधात छापेमारी करत ईडी अधिक तपास करत आहे. जप्त कागदपत्रांतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे, गरज पडल्यास ईडीकडून परब यांची पुन्हा चौकशी होऊ शकते. गुरुवारी, ईडीकडून त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली होती.