जोगेंद्र कवाडे शिंदेंसोबत, मुख्यमंत्र्यांचं कौतुक महाविकास आघाडीवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 04:28 PM2023-01-04T16:28:52+5:302023-01-04T16:31:14+5:30
जोगेंद्र कवाडे यांनी संघर्षाच्या काळात चळवळीत खूप मोठे योगदान दिलेले आहे. चळवळीसाठी त्यांनी सहा महिने तुरुंगवासही भोगला
वंचित बहुजन आघाडीने शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता शिंदे गटानेही आंबडेकरी चळवळीचा नेता आपल्यासोबत घेतला आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती केली. तसे पत्रकच जोगेंद्र कवाडे यांनी काढलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीत पीआरपीचाही समावेश झाला आहे. त्यानंतर, मुख्यमंत्री शिंदेंसमवेत कवाडे यांनी पत्रकार परिषदही घेतली.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी एक पत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आमची युती होत आहे. याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत करण्यात येणार असल्याचं जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, मुख्यमंत्री शिंदेंसोबत पत्रकार परिषद घेऊन कवाडे यांनी महायुतीत सहभागी झाल्याची घोषणा केली. “एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आले. तळागळातून संघर्ष करत वर येणारे नेतृत्व आज महाराष्ट्राच्या प्रमुखपदी बसले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे हे आमच्या निवेदनाची साधी दखलही घेत नव्हते”, अशी टीका जोगेंद्र कवाडे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर केली.
जोगेंद्र कवाडे यांनी संघर्षाच्या काळात चळवळीत खूप मोठे योगदान दिलेले आहे. चळवळीसाठी त्यांनी सहा महिने तुरुंगवासही भोगला. कवाडे यांची आक्रमकता भल्याभल्यांना घाम फोडणारी होती, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी कवाडेंचं स्वागत केलं. तसेच, जोगेंद्र कवाडे यांचा लाँग मार्च आता योग्य ठिकाणी पोहोचला आहे, अशी मिश्किल टिप्पणीही शिंदेंनी केली.