मलेरियासह डेंग्यू मुंबईकरांचा पिच्छा सोडेना, गॅस्ट्रोही वाढतोय; ‘ऑक्टोबर हिट’चा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 01:17 PM2023-10-11T13:17:37+5:302023-10-11T13:21:14+5:30
मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे या ‘ऑक्टोबर हिट’मध्येसुद्धा या डासांच्या आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : सध्या ऑक्टोबर महिना सुरू असल्याने कडाक्याचे ऊन पडले असले तरी साथीचा आजार मात्र आजही दिसून येत आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने या आजाराची या महिन्यातील पहिल्याच आठवड्याची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे या ‘ऑक्टोबर हिट’मध्येसुद्धा या डासांच्या आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
सर्वसाधारण पावसाच्या मोसमात मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसत असतात. या काळात अनेक रुग्ण या आजाराने रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये उपचार घेतात, तर काही रुग्णांचा आजार अधिक बळावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ असते. मात्र ऑक्टोबर महिना सुरू झाला असला तरी या आजारांचे रुग्ण दिसत आहेत.
विशेष म्हणजे या आजारासोबत दूषित पाणी शरीरात गेल्यामुळे गॅस्ट्रोचे रुग्ण गेल्या आठवड्यात दिसून येत आहेत. स्वाइन फ्लूचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. मलेरिया आणि डेंग्यूचा संसर्ग होत असल्याचे मुंबईत दिसून येत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
अजूनही काही ठिकाणी पाण्याची डबकी साचून, त्यामध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. डासांच्या चाव्यामुळे नागरिकांना मलेरिया आणि डेंग्यूचा संसर्ग होत असल्याचे चित्र संपूर्ण शहरात पाहायला मिळत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थळे निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोणती लक्षणे दिसतात?
- डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत ठरत असतात.
- या आजारात तापामुळे काही जणांना हाडे आणि स्नायूंत खूप वेदना जाणवत असतात. त्यासोबत डोकेदुखी, मळमळ, अंगावर लाल पुरळ येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
- या आजारात रुग्णाला त्याची लक्षणे पाहून औषधे दिली जातात. जर रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.