Join us  

वज्रमूठ कायम राहणार...; काँग्रेस शिवसेना अन् राष्ट्रवादीसोबतच, विरोधी पक्षनेतेपदावर दावा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 7:30 AM

दोन्ही पक्षांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेत महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्याचा संकल्पही केला.

मुंबई : अजित पवारांनी फडणवीस-शिंदे सरकारशी हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली असली, तरीही महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम ठेवण्याचा निर्धार काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या बैठका मंगळवारी झाल्या. त्यात दोन्ही पक्षांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेत महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्याचा संकल्पही केला. 

महाविकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादीसोबत राहण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्याबाबत काँग्रेसच्या या बैठकीत निर्णय झाला नाही. पुढील परिस्थिती लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले आहे.काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी विधानभवनात पार पडली. या बैठकीला पक्षाचे राज्य प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह ज्येष्ठ नेते, आमदार उपस्थित होते.

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले. आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून गेले आहेत. परंतु या दोन्हीही नेत्यांच्या मागे आजही मोठे जनसमर्थन आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत, असे एच. के. पाटील यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.   

बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्ष म्हणून पुढची रणनीती काय असावी यावर चर्चा झाली. महाविकास आघाडी म्हणून भाजपविरोधात लढण्यावर चर्चा झाली.  - बाळासाहेब थोरात, विधिमंडळ नेते, काँग्रेस  

काँग्रेस जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारेल व भाजपचा खरा चेहरा उघडा करेल. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढील रणनीती ठरविली जाईल.    - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसउद्धव ठाकरेमहाविकास आघाडी