Join us

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसोबत गुजरातमध्ये नेमकं कोण-कोण?; अखेर २० आमदारांची यादी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 1:17 PM

मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची यादी आली आहे.

मुंबई- विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर काल संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे काही आमदारांशी संपर्क होऊ शकत नसल्याची माहिती समोर आली आहे.

सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरत हा भाजपाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

सुरत येथे गुजरात भाजप अध्यक्ष व खासदार सी.आर.पाटील यांच्यावर महाराष्ट्रातील सेना व काँग्रेस आमदारांची सोय करण्याची जबाबदारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार खासदार पाटील यांनी सोमवारी सायंकाळी चार वेगवेगळ्या हाॕटेल्स व रिसोर्टला व्हीआयपी,सूट बुक केले आहेत. मुंबईहून रात्री दहा शिवसेनेचे आमदार सूरतकडे रवाना झाले. रात्री दीडला एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरतकडे रवाना झाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुढील २० आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

  1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
  2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
  3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
  4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
  5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
  6. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
  7. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
  8. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले
  9. आटपाडीचे आमदार अनिल बाबर
  10. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
  11. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
  12. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
  13. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे
  14. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील
  15. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
  16. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड
  17. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
  18. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
  19. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
  20. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर 

दरम्यान, शिवसेनेचे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. या आमदारांनी शिवसेना भाजपासोबत गेल्यास आम्ही तुमच्यासोबत राहू असेही म्हटल्याचे समोर येत आहे. शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी मिळत नाही, मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामांना हा निधी दिला जातो. यावेळी आमदारांना विश्वासातही घेतले जात नाही. याच्या तक्रारी उद्धव ठाकरेंकडे केल्यावर त्याची दखलही घेतली जात नाही, अशा तक्रारी शिवसेना आमदारांच्या होत्या. या साऱ्या वातावरणातच राज्यसभेला शिवसेनाचा उमेदवार पडला, याची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार