लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मॅनहोलची झाकणे चोरणाऱ्यांविरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्त, विशेष पोलिस आयुक्त तसेच सहपोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी पालिकेकडून आलेल्या तक्रारींनंतर लोकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या या चोरांविरोधात कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, या झाकणाची चोरी करून अवघ्या ५०० ते १००० रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती आहे.
झाकण चोरांची कार्यपद्धती?
झाकणांची चोरी करणाऱ्या चोरांमध्ये विशेषतः चरसी, गर्दुल्ले किंवा नशेचे व्यसन असलेल्यांचा विशेष सहभाग असतो. मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोटरसायकल किंवा स्कूटीवरून निर्जनस्थळी तसेच कमी वर्दळीच्या ठिकाणी आणि सहज प्रवेश मिळेल अशी ठिकाणे शोधून चोरी करायची. त्यानंतर रिक्षा, टॅक्सी, टेम्पो किंवा कधी कधी मोठमोठ्या ट्रकमध्ये भरूनही ती पळवली जातात. त्यानंतर पकडले जाऊ या भीतीपोटी झाकणाचे तुकडे करून त्याची विक्री केली जाते.
एका झाकणाची किंमत?
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरलेली झाकणे हे सर्वच भंगार विक्रेते खरेदी करत नाहीत. कारण ती मजबूत, जड आणि विशिष्ट प्रकारची अक्षरे कोरलेली असतात. त्यामुळे ती खरेदी करणारे देखील ठरावीक भंगारवाले आहेत. जे ही झाकणे प्रत्येकी दीड ते २ हजार रुपयांना विकत घेतात. (या झाकणाची स्थिती कशी आहे, त्यानुसार दर मिळतो. एकदम नवीन असेल तर ते दोन ते तीन हजारांनाही विकले जाते.) त्यानंतर ती पॉलिश करून रिसेल किंवा वितळवून वापरली जातात. अथवा मुंबई बाहेर पाठवली जातात. विशेषत: गुजरातमध्ये अशा प्रकारचे भंगार पाठवले जात असल्याचाही दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.
मॅनहोल चोरीच्या या काही घटना
जून, २०२३
- गावदेवी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या पेट्रोल पंप परिसरात मॅनहोलची तीन झाकणे चोरणाऱ्या सागिर सय्यद (२३) आणि इरफान शेख (२३) यांना अटक केली होती.
- बोरीवली परिसरात तब्बल १५ मॅनहोलवरील लोखंडाची झाकणे चोरून विकणाऱ्या कमलेश उर्फ बंटी सोलंकी (२९) याचा साथीदार अब्दुल गणी मोहम्मद नजीर शहा (५१)सह एम.एच.बी. कॉलनी पोलिसांनी गाशा गुंडाळला. या परिसरात २६ मॅनहोलची झाकणे चोरीला गेली होती.
ऑगस्ट, २०२३
- वाकोला पुलावरून लोखंडी मॅनहोलचे कव्हर अज्ञात व्यक्तीने चोरले होते. याप्रकरणी पोलिसांनी अनिल वर्मा (३४), अनिल केवट (२७) आणि शेहनवाज शेख (२६) यांना अटक केली होती.
- घाटकोपर पूर्व परिसरात १८ ऑगस्ट रोजी प्राणेश्वर लेन आणि डेरासर लेन या ठिकाणी तीन झाकणे चोरीला गेली. याप्रकरणी पालिकेच्या एन विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजित भगवते (३०) यांनी पोलिसात तक्रार दिली होती.