लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक औद्योगिक सिटीमध्ये मोटार गाड्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबरोबरच टोयोटा किर्लोस्कर मोटर्स ही विख्यात कंपनी याच ठिकाणी कौशल्य विकास आधारित तांत्रिक संस्थादेखील उभारणार आहे. त्यातून तरुण-तरुणींना या आणि अन्य उद्योगांमध्ये रोजगार मिळविण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाईल. टोयोटा कंपनी आपल्या सीएसआर फंडातून या संस्थेची उभारणी करणार आहे.
मोटार गाड्यांच्या प्रकल्पातील गुंतवणूक ही २० हजार कोटी रुपयांची असेल. या प्रकल्पासाठी कंपनी आणि राज्य सरकारचा उद्योग विभाग यांच्यात बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर परस्पर सामंजस्य करार झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टोयोटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा हेही उपस्थित होते.
क्रांती घडेल : मुख्यमंत्री
टोयोटाच्या या प्रकल्पामुळे भारताच्या ई-कारनिर्मिती उद्योगात क्रांती येईल. राज्य विदेशी गुंतवणुकीत अग्रेसर आहेच; दोन वर्षात दावोस येथे झालेल्या ६० दशलक्ष डॉलर्सच्या करारांची ८० टक्के अंमलबजावणी झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी जपानी भाषेत नमस्कार म्हणजे ‘कोनीचिवा’ असे संबोधत केली. आभारदेखील ‘एरिगेटो गोझामासू’ अशा शब्दांत मानले.
अपूर्णता संपली : फडणवीस
या कराराचे वर्णन ‘ऐतिहासिक’ या शब्दांत करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, टोयोटा कंपनी महाराष्ट्रात आल्याने आजवरची अपूर्णता संपली आहे. राज्यात जेएनपीटीच्या तीनपट मोठे वाढवण बंदर होणार आहे. हे देशातील सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. तसेच जालनामध्ये ड्रायपोर्ट होणार आहे.
अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी
या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. सह्याद्री अतिथीगृहावरील या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात आले. त्यावेळी त्यांनी केवळ एक तास आधी या कार्यक्रमाचे आमंत्रण आपल्याला दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढा मोठा प्रकल्प आपल्याकडे येत असताना मला केवळ तासभर आधी कल्पना कशी काय दिली असा प्रश्न त्यांनी केला.
१६ हजार रोजगारनिर्मिती
छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारचे उत्पादन होणार आहे. सुमारे ८ हजार थेट आणि अप्रत्यक्ष ८ हजार अशी १६ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे, अशी माहिती आजच्या कार्यक्रमात अधिकृतपणे देण्यात आली. प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कारची निर्मिती होणे अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी ८५० एकर जागा दिली आहे.
भारत-जपान संबंध वाढीस चालना
यावेळी मसाकाझु योशीमुरा यांनी प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्यामागची कारणे सांगितली. भारत आणि महाराष्ट्राच्या समग्र विकासात टोयोटादेखील एक भागीदार बनू इच्छिते. भारताशी या निमित्ताने जपानचे संबंध वाढीस लागतील, असेही ते म्हणाले. मानसी टाटा यांनी राज्य सरकारचे आभार मानले.