अगोदरच दुष्काळ, त्यात आता औषधांचाही साठा संपला!

By अतुल कुलकर्णी | Published: October 21, 2018 05:46 AM2018-10-21T05:46:50+5:302018-10-21T05:47:03+5:30

राज्यात औषध खरेदीचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून अनेक वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये साठा संपला आहे.

Already in drought, now the stock of drugs is over! | अगोदरच दुष्काळ, त्यात आता औषधांचाही साठा संपला!

अगोदरच दुष्काळ, त्यात आता औषधांचाही साठा संपला!

Next

मुंबई : राज्यात औषध खरेदीचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून अनेक वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये साठा संपला आहे. रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यासाठी सांगण्यात येत आहे. अनेक दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतही हीच अवस्था आहे. हाफकिन महामंडळाकडे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ९८०.८७ कोटींच्या निविदा मिळाल्या, पण प्रत्यक्षात १२ आॅक्टोबरपर्यंत फक्त २८०.९३ कोटींचीच औषधे मिळालेली आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात ९१ पैकी फक्त २१ औषधे शिल्लक आहेत. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लातूर, औरंगाबाद, नांदेड आदी वैद्यकीय महाविद्यालयांची अशीच अवस्था आहे. जिल्हा रुग्णालयांची अवस्था, तर अत्यंत विदारक आहे.
हाफकिनकडे औषध खरेदीसाठीची मागणी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाने केली. मात्र, ती औषधे कोणत्या ठिकाणी किती द्यायची, याची यादीच दिली नव्हती. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यावर आमची चूक झाली, अशी कबुली आरोग्य विभागाने दिली होती.
आजमितीला हाफकिनकडे ९८०.८७ कोटीच्या १२३७ निविदा मिळाल्या, त्यापैकी ८१६.६३ कोटी रकमेच्या १०३७ निविदा प्रसिद्ध केल्या. उर्वरित २०० निविदा अद्याप प्रसिद्धीच्या प्रतीक्षेतच आहेत. एकूण २८०.९३ कोटींचे फक्त ३७७ पुरवठा आदेश हाफकिनने दिले आहेत. एक महिन्यात ३०६.५६ कोटींचे आणखी २४४ आदेश आम्ही देऊ, असे हाफकिनचे म्हणणे आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागानेच निविदेत टाकलेल्या अटींवर हाफकिनकडे काही पुरवठादारांनी आक्षेप घेतले. विभागाने समिती नेमून त्यांच्याकडून मत मागविले होते. आता मंत्रिमंडळाचा निर्णय योग्य की अयोग्य याचा निर्णय डॉक्टरांची समिती घेणार आहे.
>कारवाईची मागणी
आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातल्या काही अधिकाºयांनी जाणीवपूर्वक राज्यभर औषध टंचाई निर्माण केली आहे. आधीच राज्यात दुष्काळ असताना आता औषधांचाही दुष्काळ करणाºया अधिकाºयांवर सरकार काय कारवाई करणार याचा जाब विचारण्यात येईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

Web Title: Already in drought, now the stock of drugs is over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :medicineऔषधं