मुंबई : घरगुती गॅसचे दर हजाराच्या घरात पोहोचले असताना सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्यांना अधिकचे पैसे द्यावे लागत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे त्याची कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नाही. त्यामुळे आम्ही अतिरिक्त रक्कम का मोजावी, असा सवाल मुंबईकरांकडून केला जात आहे.
सिलिंडर घरपोच करण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नसल्याचे एजन्सीकडून वारंवार सांगितले जाते. डिलिव्हरी बॉय मात्र त्या सूचनेचे पालन करताना दिसत नाहीत. सिलिंडरमागे २० ते ५० रुपये मागितले जातात. ग्राहकाने नकार दिल्यास अडवणुकीचा प्रकारही केला जातो. भाड्याने रहाणाऱ्या आणि सिंगल सिलिंडर असणाऱ्या ग्राहकांना बऱ्याचदा या प्रकारांना सामोरे जावे लागते. एखाद्यावेळेस अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिल्यास दुसऱ्यावेळी डिलिव्हरीसाठी जाणीवपूर्वक उशीर केला जातो. त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक नाइलाजाने पैसे देतात, असे कुर्ल्यातील ग्राहक गुणवंत दांगट यांनी सांगितले.
सध्याचा गॅस सिलिंडर दर - ८८४.५०
नऊ महिन्यांत १९० रुपयांची वाढ
महिना दर (रुपयांत)
जानेवारी ६९४
फेब्रुवारी ७६९
मार्च ८१९
एप्रिल ८०९
मे ८०९
जून ८०९
जुलै ८३४.५०
ऑगस्ट ८५९.५०
सप्टेंबर ८८४.५०
.......
डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी?
गॅस घरपोच करणाऱ्याला अतिरिक्त पैसे द्या, असा कुठलाही नियम ऐकिवात नाही. तरीही ते पैसे मागतात. न दिल्यास अडवणूक करतात. पावतीही देत नाहीत. आम्ही महागाईने त्रस्त असताना यांना कसले पैसे द्यायचे?
- वर्षा पाटील, गृहिणी
.......
वितरकांच्या प्रतिक्रिया
- डिलिव्हरी बॉयला गेल्या काही वर्षांपासून पुरेसे मानधन दिले जाते. पगारही वेळेत होत असल्याने पैसे मागणाऱ्यांचे प्रमाण अगदीच कमी झाले आहे. बऱ्याचदा ग्राहक स्वतःहून त्यांना पैसे देतात.
- आम्ही कोणत्याही डिलिव्हरी बॉयला अतिरिक्त पैसे मागण्यास सांगत नाही, अशी माहिती घाटकोपर येथील एका वितरकाने दिली.
- दुसरीकडे, आम्हाला महिन्याला १५ हजार रुपये पगार मिळतो. त्यात संसाराचा गाडा हाकणे अशक्य आहे. त्यामुळे जास्त कसरत कराव्या लागणाऱ्या ठिकाणी ग्राहकांकडून पैसे मागतो.
- उलटपक्षी ग्राहक स्वतःहून पैसे देतात. १०० रुपये दिवसाकाठी जमले तरच घरची चूल पेटण्याची चिंता नसते, असे एका डिलिव्हरी बॉयने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.