मुंबई : शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे अरुंद झालेल्या रस्त्यांवरून मार्ग काढताना मुंबईकर मेटाकुटीला आला आहे. अंधेरी उड्डाणपूल, हाजी अली सिग्नल, लालबाग आणि दहिसर टोलनाका या मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे शहरातील प्रमुख ‘चार जाम’ अशी ओळख या परिसराची होत असल्याचे चित्र आहे.
नवरात्रीनिमित्त महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. महालक्ष्मी स्थानक ते महालक्ष्मी मंदिर या सुमारे १० ते १५ मिनिटांच्या अंतरासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास लागत आहे. तर पेडर रोडही वाहतूककोंडीत अडकला आहे.
हाजी अली सिग्नलजवळ सुरू असलेल्या कामांमुळे या मार्गावर वाहनांचा खोळंबा होत आहे. अंधेरी उड्डाणपूल, एस.व्ही. रोडवर गर्दीच्या वेळेत वाहतूक अतिशय मंद गतीने पुढे सरकते. लालबाग आणि दहिसर टोल नाक्यावरही अशीच परिस्थिती आहे.
शहरात सद्य:स्थितीत ४ ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. विशेषत: मुंबई शहर आणि उपनगरात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या कामांनी वेग घेतला आहे. यामुळे महालक्ष्मी, माहिम आणि अंधेरी येथे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. परिणामी, रस्ते अरुंद झाले आहेत. दादर टिळक पुलावरून डॉ. बाबसाहेब आंबेडकर मार्गाकडे येणाºया आणि जाणाºया मार्गिकेवर दुपारच्या वेळेतही वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात. रात्री सात ते नऊ या वेळेत तर मोठी वाहतूककोंडी होते.प्रवासाला लागत आहे नेहमीपेक्षा जास्त वेळमहालक्ष्मी येथून वरळी नाका गाठण्यासाठी वाहनाने तब्बल पाऊण तासाहून अधिक काळ लागत आहे; एरव्ही वाहतूककोंडी नसल्यास हा मार्ग दहा ते पंधरा मिनिटांत पार करता येतो. दादर येथील कोंडीचा विचार करता शिवाजी पार्कपासून रस्ता मार्गे वाहनाने माहिम गाठण्यासाठी अर्ध्या तासाहून अधिक काळ लागत आहे; प्रत्यक्षात हे अंतर दहा ते पंधरा मिनिटांचेच आहे.