"उद्योगांच्या संरक्षणासाठीही ‘कोविड पंचसूत्री’चा अवलंब करा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:32 AM2020-06-27T04:32:41+5:302020-06-27T04:33:28+5:30

कोविडपासून संरक्षणासाठी आपण स्वीकारलेली पंचसूत्रीच उद्योगांसाठीही लागू असल्याचे मत आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंदडा यांनी शुक्रवारी मांडले.

"Also adopt 'Kovid Panchasutri' to protect industries" | "उद्योगांच्या संरक्षणासाठीही ‘कोविड पंचसूत्री’चा अवलंब करा"

"उद्योगांच्या संरक्षणासाठीही ‘कोविड पंचसूत्री’चा अवलंब करा"

Next

मुंबई : कोरोनापश्चात उद्योगांची घडी सुरळीत ठेवण्याचे आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी स्वच्छ कार्यपद्धतीवर भर द्या. कौशल्यांवर लक्ष केंद्रित करा. अन्य क्षेत्रात प्रवेश करण्याचा अवाजवी धोका पत्करू नका. अधिक फायद्याचा मोह टाळा. वेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक करून झटपट श्रीमंतीच्या आमिषाला बळी पडू नका. व्यवसाय अडचणीत असेल तर योग्य सल्लामसलतीने कोंडी फोडण्याचा प्रयत्न करा. कोविडपासून संरक्षणासाठी आपण स्वीकारलेली पंचसूत्रीच उद्योगांसाठीही लागू असल्याचे मत आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंदडा यांनी शुक्रवारी मांडले.
कोरोनामुळे निर्माण झालेली मंदी, भारत- चीनमधील वाढत्या तणावामुळे आलेली अनिश्चितता, सरकारकडून अपेक्षापूर्ती होत नसल्याच्या भावनेने व्यावसायिकांत प्रचंड अस्वस्थता आहे. या स्थिती सूक्ष्म, लघू, मध्यम (एमएसएमई) उद्योजकांना मार्गदर्शन आणि बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स (बीएफएसआय) क्षेत्रातील आव्हाने-संधींचा उहापोह करणारा वेबिनार ‘लोकमत’तर्फे पार पडला. त्यात मुंदडा यांच्यासह पूनावाला फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा, इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाचे अध्यक्ष अतुलकुमार गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. डब्ल्यूआयआरसीचे व्हाईस चेअरमन उमेश शर्मा यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
कोरोनामुळे अनेक व्यवसायांना टाळे लागेल हे वास्तव स्वीकारून, योग्य मूल्यांकन करून उद्योग सुरू ठेवायचा की नाही याचा निर्णय घ्यावा लागेल, असे स्पष्ट मत मुंदडा यांनी व्यक्त केले.
नोटबंदी डिजिटल पेमेंटवृद्धीस पूरक ठरली होती. त्याच धर्तीवर कोविडमुळे डिजिटल कर्ज पुरवठ्याच्या व्यवहारांना चालना मिळेल, असा विश्वास पूनावाला फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा यांनी व्यक्त केला. ग्राहकांच्या मानसिकतेतील बदल, टेक्नॉलॉजीचा वाढता वापर, कायद्याच्या चौकटीत आलेले डिजिटल व्यवहार आणि त्यासाठी राबविल्या जाणाऱ्या अभिनव संकल्पना या व्यवसाय वृद्धीसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नव्या स्टार्टअप आणि व्यवसायांनाही कर्ज पुरवठा कसा उपलब्ध होईल, व्यक्तिगत गुंतवणुकीसाठी कोणते प्रभावी पर्याय आहेत असे अनेक प्रश्न मुंदडा, भुतडा आणि गुप्ता यांना विचारून शर्मा यांनी वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या शंकांचे निरसन करण्यास मदत केली.
>दूरदर्शी धोरण ठरविण्याचे आव्हान
कोरोनानंतरच्या काळात व्यवसायात अनेक नव्या सेक्टर्सचा उदय होईल, तर अनेक परंपरागत व्यवसायांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्हे आहेत. भविष्यात कोणत्या व्यवसायाची भरभराट होईल, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे प्रत्येकाला नवे बदल स्वीकारत वाटचाल करावी लागेल, असे मत इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाचे अध्यक्ष अतुलकुमार गुप्ता यांनी मांडले. परताव्याची हमी नसल्याने पैसा असला तरी गुंतवणुकीचा धोका पत्करण्यास कुणी तयार नाही. कमी व्याजदराच्या काळात गुंतवणूक सुरक्षित नसणे ही मोठी आव्हानात्मक परिस्थिती असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
>पंचसूत्रीची मूठ भक्कम हवी
उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी सुचविलेल्या पंचसूत्रीची मूठ भक्कम असून ती एमएसएमईसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. बँका आणि ग्राहक यांच्यातील विश्वासार्हता वाढविण्यासाठी आणि आयबीआयने दिलेल्या सवलती गरजूंपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न करायला हवेत.
- उमेश शर्मा, व्हाईस चेअरमन, डब्ल्यूआयआरसी

आॅनलाइन पाहण्यासाठी

https://www.youtube.com/watch?v=JDJTC-1lDlA&feature=youtu.be

https://www.facebook.com/lokmat/videos/317033816124008/

Web Title: "Also adopt 'Kovid Panchasutri' to protect industries"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.