मुंबई : दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या चार राज्यांतून रस्त्याने, रेल्वेने, विमानाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने कोरोनाची बाधा झाली नसल्याचा तपासणी अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र मालवाहतूक करणाऱ्यांचा त्यात उल्लेख नसल्याने ते गोंधळले आहेत.इतर राज्यांतून मालवाहतूक करणारे असंख्य ट्रक दररोज महाराष्ट्रात येतात व इथून दुसरीकडे जातात. या ट्रकचालकांनीही कोरोनाची लागण झाली नसल्याचा तपासणी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे का, अशी विचारणा करणारे अनेक ई-मेल व पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मालवाहतूकदारांनी पाठविली आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी) या संघटनेने केली आहे.
देशातील अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणारे मालवाहतूक ट्रकचे चालक, क्लीनर यांनी कोणते नियम पाळावेत हे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट करावे. या नियमांचे आम्ही कसोशीने पालन करू, असे मालवाहतूकदारांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने नियम न बनविल्याने ट्रकचालकांची अडवणूक झाली तर ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
केवळ प्रवासी वाहतुकीचाच विचारकोरोनाची बाधा झालेल्या प्रवाशांना माघारी पाठविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र मालवाहतूकदारांपैकी कोणाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले तर त्या चालकासह ट्रकलाच महाराष्ट्रातून माघारी पाठविणार की अजून वेगळी कारवाई करणार? याबद्दल संदिग्धताच आहे. या कारवाईमुळे होणाऱ्या नुकसानीमुळेही चिंता वाढल्याचे मालवाहतूकदारांनी सांगितले.