Join us

म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचाही काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:06 AM

मागणी वाढल्याने तुटवडा; दर आता दहा हजारांच्या घरातलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : म्युकरमायकोसिस या संसर्गजन्य आजारासाठी उपयुक्त ...

मागणी वाढल्याने तुटवडा; दर आता दहा हजारांच्या घरात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : म्युकरमायकोसिस या संसर्गजन्य आजारासाठी उपयुक्त असलेल्या अम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचा बाजारपेठांत काळाबाजार हाेत असल्यामुळे तुटवडा भासत आहे. यापूर्वी, साडेतीन हजारांच्या घरात असणाऱ्या अम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचे दर आता दहा हजारांच्या घरात पोहोचले आहेत.

या इंजेक्शनच्या दरांवर जीएसटी कर वाढल्यामुळेही अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी काही रुग्णांच्या कुटुंबियांनी केल्या. पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, येत्या २-३ दिवसांत या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध होईल. पालिका रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना या इंजेक्शनचे दर परवडणारे नसल्याने अधिक खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान, औषध विक्रेत्यांसारखी साखळी आधीच असताना आणि रुग्णांना त्यामुळे ती लगेच उपलब्ध होऊ शकतील, अशी परिस्थिती असतानाही सरकार मात्र तातडीने लागणाऱ्या या औषधांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरण करीत आहे, अशी नाराजी औषध विक्रेत्यांमध्ये आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे कामाचा व्याप अधिक असतो, त्यात मनुष्यबळ अपुरे असते. त्यामुळे रुग्णांना औषधी लवकर मिळत नाही. एका इंजेक्शनची किंमत ४ हजार रुपये आहे, एका रुग्णाला १६-१७ इंजेक्शन द्यावे लागतात. साहजिकच या इंजेक्शनची प्रचंड मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे हा आजार झपाट्याने शरीरात पसरतो आणि मृत्यू ओढावतो. म्हणून या औषधांचा पुरवठा त्वरित व्हावा, अशी अपेक्षा असते. मात्र, आता हे औषधही मिळणे कठीण होणार असल्याने त्याचा काळाबाजार होत आहे, असे महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी सांगितले.

* ‘एमआरआय’द्वारे योग्य निदान

म्युकरमायकोसिस या आजारात बुरशी शरीरात नाकातून डोळे, मेंदू अशी पसरली जाते. त्याचे निदान सीटी स्कॅन किंवा इतर चाचणीद्वारे होत नाही. एमआरआयमध्येच योग्यरीतीने होते. प्रत्येक रुग्णाचे एमआरआय करणे गरजेचे आहे. एमआरआय करण्यासाठी साधारण एक तास लागतो आणि ही चाचणी महागही आहे. सध्या चाचण्या केंद्रांवर सीटी स्कॅनसाठीच एवढी गर्दी असते की एमआरआयसाठी वेळ देण्यास केंद्र तयार होत नाहीत. त्यामुळे पुढील काळात परिस्थिती आणखी आव्हानात्मक असेल, असे मत कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. सौमित्र गुणे यांनी मांडले.

* संसर्गाच्या तीव्रतेनुसार ठरते मात्रा

या आजारात संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन त्यानुसार इंजेक्शनची मात्रा ठरविण्यात येते. काही रुग्णांना पाच दिवसांत ५० मिलिग्रॅमची २० इंजेक्शन्स द्यावी लागतात. गेली अनेक वर्षे हा आजार अस्तित्वात आहे. मात्र, सध्या पोस्ट कोविड स्थितीत या आजाराचा वाढणारा संसर्ग चिंतेचा विषय आहे; परंतु त्याविषयी अभ्यास-निरीक्षण सुरू असून, लवकरच या आजारावरही नियंत्रण मिळविता येईल.

- डॉ. रविशंकर नेमाडे, घसातज्ज्ञ

..........................................................