एनसीबीच्या चौकशीचेही थेट समालोचन करा - सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 06:27 AM2020-09-28T06:27:29+5:302020-09-28T06:27:41+5:30
चौकशीच्या थेट प्रक्षेपणाचे हक्काच्या लिलाव केला तर तिजोरीत काही रक्कम नक्की जमा होईल. त्यामुळे भाजपचे आर्थिक व राजकीय दोन्ही हेतू साध्य होतील.
मुंबई : बॉलीवूडमधील अंमली पदार्थांच्या जाळ्याची केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) चौकशी करत आहे. मात्र, या चौकशीतून मिनिटा-मिनिटाची माहिती बाहेरच उघड होत आहे. क्रिकेटमधील समालोचनाप्रमाणे प्रसारमाध्यमातून ही माहिती ऐकवली जात आहे. अशीच चौकशी करायची असल्यास आयपीएलप्रमाणे सीबीआय, ईडी, एनसीबीच्या चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचे लिलावच करून टाका. त्यातून किमान सरकारच्या तिजोरीत काही पैसा तरी येईल, असा उपरोधिक सल्ला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.
चौकशीच्या थेट प्रक्षेपणाचे हक्काच्या लिलाव केला तर तिजोरीत काही रक्कम नक्की जमा होईल. त्यामुळे भाजपचे आर्थिक व राजकीय दोन्ही हेतू साध्य होतील. सरकारचे अपयश लपवणे आणि मुख्य समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असा गैर मुद्द्यांचा गाजावाजा केल्यास भाजपला फायदा होतो. मुख्य समस्यांकडे जनता लक्ष देणार नाही त्यासाठी अशा प्रक्षेपणाचा फायदा होईल. असे सर्व फायदे पाहता सरकारने याचा गांभिर्याने विचार करावा असा उपरोधिक सल्लाही सावंत यांनी दिला आहे.
‘त्या’ कलाकारांच्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही - आठवले
ज्या चित्रपट कलाकारांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून अंमली पदार्थ सेवन करतात म्हणून शिक्केमोर्तब झाले आहे अशा कलाकारांना चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटात काम देऊ नये. अन्यथा अशा चित्रपटांचे चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल, या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.