ओव्हरहेड वायरच्याही तपासण्या; लवकरच मेट्रो रुळांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:06 AM2021-05-24T04:06:42+5:302021-05-24T04:06:42+5:30
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई २ अ आणि मेट्रो ७ ची कामे आणखी वेगाने सुरू करण्यात ...
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई २ अ आणि मेट्रो ७ ची कामे आणखी वेगाने सुरू करण्यात आली आहेत. याचा कामांचा भाग म्हणून ओव्हरहेड वायरच्या तपासणीसह उर्वरित कामांनी वेग पकडला आहे. नुकतेच दिल्ली येथील चीफ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांच्या देखरेखीखाली मेट्रो लाईन २ वर दहिसर ते कामराज नगरदरम्यान २५ केव्ही ओव्हरहेड साहित्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीमुळे मेट्रोच्या अंतिम कामाच्या यादीत आणखी एक भर पडली असून, मेट्रो वेगाने रुळांवर येण्यास मदत होणार आहे. मेट्रोच्या चाचणीपूर्वी करण्यात आलेली ही तपासणी मैलाचा दगड असून, येत्या काही दिवसांतच मेट्रोची चाचणीदेखील करण्यात येणार आहे, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रोंची कामे वेगाने पूर्ण होत असून, या दोन्ही मेट्रो लाईन येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. मेट्रो ट्रॅकवर केटेनरी मेंटेनन्स वाहन सुरू करण्यात आले असून, मेट्रोवरील केटेनरी ओएचई वायर लाईनच्या दुरुस्तीसह देखभालीसाठी याचा उपयोग केला जाईल. २०१६ साली या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. पाच वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आहे. या दोन्ही मेट्रो सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबई मेट्रोची प्रत्येक ट्रेन सहा कोचची आहे. कोचमध्ये ५२ प्रवाशांची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे. एका डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य आहे. एका ट्रेनची प्रवासी क्षमता २२८० आहे.
-----------------
मेट्रो २ अ : दहिसर पूर्व ते डीएन नगर
मेट्रो ७ : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व