Join us

यशवंत जाधव अन् इक्बाल सिंह चहल यांचीही चौकशी करा; विनायक राऊतांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 4:51 PM

ईडीच्या या कारवाईवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: ईडीने मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे. ठाकरे गटाने गद्दार दिन साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने मुंबईत मोठे ऑपरेशन राबविले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांवर एकापाठोपाठ एक छापे टाकण्यात आले. 

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. पाटकर यांच्याशी संबंधित १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीयांवरही छापेमारी सुरु आहे. ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. 

ईडीच्या या कारवाईवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली जात आहे. अशाने शिवसैनिकांचा खच्चीकरण होणार नाही. घाणेरड्या वृत्तीने अशा प्रकारे कारवाई केली जात आहेत. राजकीय द्वेषापोटी गाडलेला मड उखडून काढण्याचा काम सरकारने सुरु केलेलं आहे. शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव आणि आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे. 

नेमकी काय कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही-

नेमकी काय कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो की ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळण्यात आले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :विनायक राऊत शिवसेनाअंमलबजावणी संचालनालय