Join us

प्रकल्प पूर्ण करताना हवामानाकडेही लक्ष ठेवा; डॉ. संजय मुखर्जी यांची सूचना, ट्रान्स हार्बर लिंकला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 12:39 PM

कामाचे नियोजन करून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मान्सूनच्या कालावधीत वातावरणीय बदल, अतिवृष्टी तसेच असमतोल हवामानामुळे समुद्राच्या मध्यभागी प्रगतीचा वेग राखणे कठीण असते. यासाठी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी कंत्राटदार आणि सल्लागारांना हवामानाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या तसेच त्यानुसार कामाचे नियोजन करून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाच्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा डॉ. मुखर्जी यांनी घेतला. त्यांनी प्रकल्पाचे पैलू समजून घेऊन प्रकल्पात आणखी काही सुधारणा करता येतील का, यावर सर्वसमावेशक चर्चा केली. भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या विविध घटकांची जसे की वॉटर प्रूफिंग आणि सरफेसिंग, व्हायाडक्ट पिअर्स, सेगमेंटसमधली जोडणी आणि पोहाच मार्ग, प्रकल्पाची संरचनात्मक अखंडता आणि अतिवृष्टीसारख्या संभाव्य तसेच भरती- ओहोटी इत्यादींविरुद्ध सुरक्षितता सुनिश्चित करून मान्सूनदरम्यान प्रकल्पाची प्रगती अखंड राहावी, याची काळजी घेण्याच्या सूचनाही  केल्या.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जवळपास १६.५ किमी भाग सागरी हद्दीत आहे. संपूर्ण मान्सूनदरम्यान वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट उदाहरण

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्टतेचे उदाहरण आहे. ज्याने मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडले आहे. हा २२ किमी लांबीचा सागरी पूल आहे. ज्याचा १६.५ किमी भाग समुद्रात आहे आणि ५.५ किमी लांबीचा भाग जमिनीवर आहे.

मान्सूनपूर्व आढावा महत्त्वाचा

पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा महत्त्वाचा असतो. आढाव्यांमुळे पावसाळ्यादरम्यान प्रकल्पाची प्रगती साधताना संभाव्य दुर्घटना, व्यत्यय टाळण्यासाठी उपाययोजना असल्याची खात्री करण्यास मदत करतात.

प्रकल्पाचा सखोल आढावा आणि मान्सूनपूर्व तयारीची सर्व पाहणी केल्यानंतर, मला खात्री आहे की एमएमआरडीएची टीम पूर्णपणे सुसज्ज आहे आणि कोणत्याही हवामानात कार्यक्षमतेने काम करण्यास तयार आहे. - डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए.

 

टॅग्स :मुंबई