Join us  

अशीही माणसूकी : रक्तपेढीला रक्तदान करण्यात मुंबईकरांची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 4:58 PM

सध्या कोरोनाच्या वातावरणात मुंबईतील विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

 

मुंबई : सध्या कोरोनाच्या वातावरणात मुंबईतील विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनामुळे रक्तदान करण्यास रक्तदात्यांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे. तसेच मोठी रक्तदान शिबिरे भरवण्यात देखील अडचणी आहेत. टाटा कॅन्सर हॉस्पिटल परळ मुंबईच्या रक्तपेढीमध्ये  देखील रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रा. स्व. संघ जनकल्याण समिती तर्फे रक्तदाता मिळवून देण्यासाठी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन च्या माध्यमातून काम चालते . तेव्हा टाटा कॅन्सर हॉस्पिटल रक्तपेढीत रक्तदान करण्याचे आवाहन रा.स्व. संघ जनकल्याण समिती कुर्ला विभागातर्फे करण्यात आले. त्याला कुर्ला येथील मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंडळांनी पुढाकार घेऊन आपल्या मंडळातील कार्यकर्त्यांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले व कार्यकर्त्यांनी पण त्याला चांगला प्रतिसाद दिला. आतापर्यंत १०२ लोकांनी रक्तदान केले आहे.दत्तगुरु सेवा मंडळ १५,  छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा मंडळ व मोरया प्रतिष्ठान १३, श्रीगणेश क्रिडा मंडळ ११ या मंडळांनी विशेष सहभाग घेतला आहे. या १०२ रक्तदात्यांमध्ये ६ महिलांचा देखील समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी रा.स्व. संघ जनकल्याण समिती तर्फे बसची व्यवस्था करण्यात आलेली असून सध्याची परिस्थिती कठीण असली तरी सगळ्यांनी सामाजिक भान जपणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे रक्तदान करणे आवश्यक आहे, असे रा.स्व. संघ जनकल्याण समितीचे कुर्ला येथील कार्यवाह संजय माळकर यांनी सांगितले. तसेच रा.स्व. संघ जनकल्याण समिती कुर्ला भागाच्या माध्यमातून २०० बाटल्या रक्तदान टाटा कॅन्सर हॉस्पिटलला करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. त्यानिमित्ताने  जनतेला तसे आवाहन केले आहे.

टॅग्स :रक्तपेढीकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या