लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपण आपल्या देशाच्या विकासाचा विचार करताना भूतकाळात डोकावतो; पण भूतकाळात डोकावताना, गोष्टींचा आढावा घेताना भविष्यकालीन नियोजनदेखील केले पाहिजे. हे करताना धोरणांवर लक्ष केंद्रित करीत दारिद्र्यरेषेखालील घटकांवर विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत अर्थतज्ज्ञ योगिंदर अलघ यांनी इंडिया इंटरनॅशनल सेंटरतर्फे आयोजित ‘इंडिया अॅट ७५’ या वेबिनारमध्ये मांडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष एन. एन. व्होरा होते.
योगिंदर अलघ यांनी यावेळी विविध मुद्यांना स्पर्श केला. ते म्हणाले की, आपण आपल्या धोरणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. गेल्या कित्येक वर्षांत आपण काय केले याचा आढावा घेताना भविष्याचे नियोजनदेखील नीट केले पाहिजे. ग्रामीण असो वा शहरी प्रत्येक विभागाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. दारिद्र्यरेषेखालील घटकांचा विचार केला पाहिजे. येथील समस्या सोडविल्या पाहिजेत, तसेच कृषीविषयक घटकांकडे लक्ष दिले पाहिजे. हे सगळे करताना शाश्वत विकास महत्त्वाचा आहे. यापूर्वी झालेल्या परिषदांमध्ये सातत्याने शाश्वत विकासावर चर्चा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील अनेक चर्चा होतात. यातून सकारात्मक आणि क्रियाशील विचार पुढे आले पाहिजेत.
भारत सर्वच दृष्टिकोनातून पुढे जात आहे. आपण आर्थिक महासत्ता आहोत. आपल्याकडे विविध धर्म आणि संस्कृती एकत्र नांदत आहे. त्यामुळे विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि हे करताना सरकारांचा समन्वयदेखील असला पाहिजे. दरम्यान, स्थलांतरण अत्यंत वाईट आहे. कित्येक मृत्यू होत आहेत. आपण रोजगारनिर्मिती केली पाहिजे. कला-कौशल्य यात वाढ केली पाहिजे. ग्रामीण भारताचा विकास केला पाहिजे, असेदेखील योगिंदर अलघ म्हणाले.