राज्यातील गुन्हेगारीलाही स्थगिती द्या; आशिष शेलारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:23 AM2019-12-11T11:23:12+5:302019-12-11T11:24:09+5:30
पोलीस यंत्रणेचे गुन्हेगारीकडे दुर्लक्ष तर झाले नाही ना? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण व्हावेत असं चित्र सध्या राज्यात दिसते असा आरोप करण्यात आला आहे.
मुंबई - गेल्या 10 दिवसात राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करा,अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
या पत्रात आशिष शेलारांनी म्हटलंय की, राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून १० दिवसांत अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडत असून त्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील अस्थिरतेचा फायदा गुन्हेगारांनी उचलला नाही ना? तसेच सरकार स्थापन होऊन खाते वाटप झाले नाही. जबाबादाऱ्या निश्चित झाल्या नाहीत, त्यामुळे पोलीस यंत्रणेचे गुन्हेगारीकडे दुर्लक्ष तर झाले नाही ना? असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण व्हावेत असं चित्र सध्या राज्यात दिसते असा आरोप करण्यात आला आहे.
गेल्या10 दिवसात राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करा,अशी मागणी करीत मी आज मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 10, 2019
"राज्यातील गुन्हेगारीला ही स्थगिती द्या!" 1/2 pic.twitter.com/TjhRCdwdh8
नागपूर, ठाणे येथे अल्पवयीन मुलींवर बलात्कार, कल्याण, चेंबूर, वाकोला येथे खून, विरारमध्ये मारहाण, चुनाभट्टी येथे मुलीला गाडीखाली चिरडणे, एमडी ड्रग्सचा साठा जप्त करणे या अशा अनेक गंभीर घटना गेल्या १० दिवसात घडल्या आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचे बिघडलेले चित्र जनतेसमोर येत आहे. खून, चोरी, विनयभंग, बलात्कार अशा गंभीर स्वरुपातील घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण जनतेमध्ये आहे असं आशिष शेलारांनी सांगत तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.
तसेच ज्या तत्परतेने आणि जलदगतीने या सरकारने मागील शासनाने घेतलेल्या विकासकामांना स्थगिती देण्याचं काम केले आहे. त्याच तत्परतेने आणि जलदगतीने राज्यातील गुन्हेगारीला स्थगिती मिळविण्यासाठी काम करावं अशा टोला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार बनलं, २८ नोव्हेंबरला या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी पार पडला तरीही अद्याप मंत्र्यांना खातेवाटप आणि विस्तार झाला नसल्यामुळे भाजपाकडून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतली त्यामुळे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपा पुरेपुर प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.