मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै २०२१ रोजी विधान भवन मुंबई येथे होणार आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी विधानभवन प्रवेशासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समित्यांची २२ जून रोजी बैठक झाली होती. त्या बैठकीतील निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी विधानभवनात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
दोन्ही सभागृहांचे सदस्य, त्यांचे वाहनचालक आणि वाहनातून मुंबईत येणारे सहप्रवासी या सर्वांनी आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे आवश्यक असेल. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य राहील. विधानभवन प्रवेशद्वाराजवळील मंडपात ३ आणि ४ जुलै २०२१ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आरटी-पीसीआर चाचणीची सुविधा सर्व संबंधितांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. बैठकीला विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, जे. जे. रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता डॉ. माणकेश्वर आदी उपस्थित होते.