डीटीएच सेवा पुरवठा दार कंपनी बदलली तरी सेट टॉप बॉक्स बदलण्याची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 06:45 PM2020-04-12T18:45:59+5:302020-04-12T18:47:08+5:30
ट्रायची शिफारस
मुंबई : डायरेक्ट टु होम (डीटीएच) व केबल सेट टॉप बॉक्स(एसटीबी) सेवा घेतलेल्या ग्राहकांनी सेवा पुरवठादार कंपनी बदलली तरी त्यांना सेट टॉप बॉक्स बदलण्याची गरज भासणार नाही
असा नियम बनवून तो नियम अनिवार्य करावा अशी शिफारस भारतीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राय) ने केली आहे. त्यामुळे या पुढील काळात सेट टॉप बॉक्स न बदलता सेवा पुरवठादार
कंपनी बदलण्याचा हक्क ग्राहकांना मिळू शकेल.
डीटीएच व एसटीबी मध्ये इंटर ऑपरेबिलीटी सपोर्ट दिला जावा असे ट्रायने स्पष्ट केले आहे. सूचना व प्रसारण मंत्रालयाने याबाबत आवश्यक ते नियम बनवावेत व त्याची अंमलबजावणी करावी,
असे निर्देश ट्रायने दिले आहेत. सध्या या सेवा घेतलेल्या ग्राहकांना कंपनी बदलल्यास नव्याने सेट टॉप बॉक्स घ्यावे लागतात व पूर्वीचा सेट टॉप बॉक्स वापरता येत नाही. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण आर्थिक फटका बसत आहे. या शिफारशीमुळे ग्राहकांना चांगल्या सेवेकडे वळण्याचा मार्ग उपलब्ध राहील व या क्षेत्रात अधिक निकोप स्पर्धा होऊन या क्षेत्राची देखील वाढ होईल, असा विश्वास ट्रायने व्यक्त केला आहे. याशिवाय, देशातील सर्व डिजिटल टीव्ही साठी युएसबी पोर्ट वर आधारित कॉमन इंटरफेस अनिवार्य करण्याची देखील शिफारस केली आहे. त्यासाठी सूचना व प्रसारण मंत्रालयाने एक समन्वय समिती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या समन्वय समितीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्फॉर्मेशन मंत्रालय, ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्स (बीआयएस) व टीव्ही उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल, असे ट्रायने स्पष्ट केले आहे. ही समिती याबाबत अभ्यास करेल व त्यानंतर डीटीएच व केबल टीव्ही सेगमेंट दोन्हीसाठी नवीन एसटीबी नियम लागू करण्यात येतील.