लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अरबी समुद्रात उठलेले तौत्के चक्रीवादळ आता थेट दिल्लीपर्यंत दाखल झाले असले तरी चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जाेर कायम आहे. मुंबईचा विचार केल्यास शहरासह उपनगरात बुधवारी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. याशिवाय बहुतांश ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू हाेती. दुपारी दोन नंतर ढगाळ वातावरण हटल्यानंतर मुंबईकरांना सूर्यनारायणाचे दर्शन घडले.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तौत्के चक्रीवादळाचे रूपांतर आता कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. ते दक्षिण पूर्व राजस्थान व लगतच्या भागात घोंगावत आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट तर मराठवाड्याच्या बहुतांश भागात आणि कोकण, गोवा, विदर्भाच्या तुरळक भागात लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. हवामानातील बदल आता कमी होत असले तरी २० मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
......................................