इंधन दर कमी झाले असले तरी तिकीट दरात कपात नको
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 01:54 AM2019-01-04T01:54:26+5:302019-01-04T01:54:42+5:30
एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या दरात घसरण झाली असली, तरी वर्षभर हे दर अत्यंत चढे राहिल्याने हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता.
मुंबई : एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या दरात घसरण झाली असली, तरी वर्षभर हे दर अत्यंत चढे राहिल्याने हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे तातडीने विमान तिकिटांचे दर कमी न करता सध्याचे दर कायम ठेवण्याची भूमिका हवाई प्रवासी संघटनेने घेतली आहे. जेणेकरून तोट्यातील कंपन्यांना यामुळे काहीसा नफा होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
याबाबत, एअर पॅसेंजर असोसिएशन आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. सुधाकर रेड्डी म्हणाले, जानेवारी २०१८ मध्ये प्रति किलो लीटर ५७ हजार १३३ रुपये असलेल्या एटीएफच्या दरात वर्षाअखेरपर्यंत डिसेंबर महिन्यात प्रति किलो लीटर ६७ हजार ९७९ रुपये इतकी प्रचंड वाढ झाली होती. नवीन वर्षाच्या प्रारंभी त्यामध्ये मोठी घसरण होऊन हा दर ५८ हजार १७ रुपयांवर आला आहे. वर्षभर हवाई वाहतूक कंपन्यांना दरवाढीमुळे प्रचंड तोटा सहन करावा लागल्याने आता कमी झालेल्या दरांमुळे त्यांना काहीसा नफा होण्याची शक्यता आहे. मात्र, तिकीट दरांत त्वरित कपात न करता सध्याचे दर कायम ठेवल्यास तोट्यातील कंपन्या सावरतील. त्यामुळे अशी भूमिका घेतल्याची माहिती रेड्डी यांनी दिली.
संघटनेचे मुंबई अध्यक्ष सुनील चोप्रा म्हणाले, हवाई कंपन्या महिनाभर तरी तिकीट दर कमी करणार नाहीत
व आपला नफा कमावतील. मात्र, गेल्या वर्षभराच्या तोट्याचा विचार करून आम्ही त्याला आक्षेप घेणार नाही. हे दर कायम राहिले किंवा त्यामध्ये आणखी घट झाली तर आपोआप विमान कंपन्यांना प्रवासाचे दर कमी करावे लागतील व प्रवाशांना त्याचा लाभ होईल, असे चोप्रा म्हणाले.
मुंबईतील गेल्या वर्षभरातील एव्हिएशन टर्बाइन इंधनाचे दर
महिना दर
जानेवारी २०१८ ५७,१३३
फेब्रुवारी ६०,५८१
मार्च ६०,७३८
एप्रिल ६१,०२५
मे ६४,९०१
जून ६९,६०३
जुलै ६७,७२२
आॅगस्ट ६८,७९१
सप्टेंबर ६९,१६१
आॅक्टोबर ७४,१७७
नोव्हेंबर ७६,०१३
डिसेंबर ६७,९७९
जानेवारी २०१९ ५८,०१७
(इंधनाचे दर प्रति किलो लीटरमध्ये)