पावसाळा नाही तरी आभाळ आले दाटून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:15 AM2021-01-08T04:15:41+5:302021-01-08T04:15:41+5:30
सलग तिसरा दिवस ढगाळ हवामानाचा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पावसाळा केव्हाच संपला आहे, मात्र तरीही हवामानात बदल होत ...
सलग तिसरा दिवस ढगाळ हवामानाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळा केव्हाच संपला आहे, मात्र तरीही हवामानात बदल होत आहेत. परिणामी मुंबईत सलग तीन दिवस ढगाळ हवामान नोंदविण्यात येत आहे. रविवारी मध्यरात्री साडे तीन वाजता उपनगरात पावसाची नोंद झाल्यानंतर सोमवारी देखील हवामान ढगाळ नोंद झाले. तर मंगळवार देखील सर्वसाधारण ढगाळ हवामानाचा नोंदविण्यात आला असून, राज्यात देखील काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली.
पंजाबपासून अरबी समुद्रापर्यंत हवामानात बदल झाले आहेत. याचा परिणाम म्हणून मुंबई आणि राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि लगतच्या प्रदेशात काही ठिकाणी गेल्या चोवीस तासांत हलक्या पावसाची हजेरी लावली, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून देण्यात आली. मंगळवारी देखील मुंबईत हवामान ढगाळ नोंद झाले. दुपारी काही काळ मळभ हटले होते. पण दुपारी चारनंतर पुन्हा दाटून आलेल्या ढगाळ हवामानामुळे लवकरच सायंकाळ झाल्याचे चित्र होते.
मुंबई आणि राज्यात पुढील तीन दिवस असेच वातावरण राहील. किंचित ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, हवामानात होत असलेल्या बदलामुळे बहुतांश ठिकाणी तापमानात देखील बदल नोंदविण्यात येत आहे. मुंबईच्या किमान तापमानात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. मुंबईचे किमान तापमान २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. राज्याचा विचार करता पुणे, सोलापूर, सातारा, नांदेड, रत्नागिरी, उस्मानाबाद अशा अनेक शहरांचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात येत आहे. पुढील काही दिवस पारा असाच राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.