नाशिकमुळे अडले सातारचे घोडे! उमेदवारी जाहीर नसली तरी उदयनराजे गुरुवारी अर्ज भरणार
By दीपक भातुसे | Published: April 16, 2024 09:07 AM2024-04-16T09:07:30+5:302024-04-16T09:08:26+5:30
तिढा कधी सुटणार? उमेदवारी जाहीर नसली तरी उदयनराजे गुरुवारी अर्ज भरणार
दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारख निश्चित केली तरी अद्याप पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महायुतीत सातारची जागा अजित पवार गटाकडे आहे. मात्र भाजपला ही जागा उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीसाठी हवी आहे, तर सातारच्या बदल्यात अजित पवार गटाला नाशिकची जागा छगन भुजबळ यांच्यासाठी हवी आहे. मात्र, शिंदेसेनेकडे असलेली नाशिकची जागा ते सोडायला अद्याप तयार नाहीत. त्यामुळे नाशिकची जागा अजित पवार गटाला मिळत नसल्याने सातारची जागा उदयनराजेंच्या उमेदवारीसाठी भाजपला सोडण्याचा निर्णय अद्यापही लटकलेला आहे.
सातारा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात झाली असून, १९ एप्रिल शेवटची तारीख आहे. उदयनराजे भोसले १८ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अजित पवार गटाने उदनयराजे यांना घड्याळ चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती. मात्र, ती धुडकावत कमळ चिन्हावरच लढणार यावर उदनयराजे ठाम आहेत. येत्या एक-दोन दिवसात सातारच्या जागेचा तिढा सुटेल आणि ही जागा भाजपला मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबादेत तीन इच्छुक, मुख्यमंत्री निर्णय घेणार
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादची जागा शिंदेसेनेचीच आहे. आमच्याकडे पालकमंत्री संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ आणि विनोद पाटील हे तिघे इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारीसंदर्भात मंगळवारी निर्णय घेणार असल्याची माहिती शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री शिंदे हे रविवारी रात्री चिकलठाणा विमानतळावर आले होते. विमानतळावर मी स्वत: विनोद पाटील व राजेंद्र जंजाळ यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी तिढा दोन दिवसांत सुटेल, असे सूतोवाच केल्याचे आ. शिरसाट यांनी सांगितले. नाशिक व औरंगाबादची जागा शिवसेनेचीच आहे. रत्नागिरीसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.