सगळेच वातावरण बिघडलेले, तरी पालिकेचा वातावरण कृती आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 12:41 PM2022-03-20T12:41:20+5:302022-03-20T12:41:38+5:30

मुंबईच्या नैसर्गिक किनाऱ्यापासून ते हवेच्या गुणवत्तेपर्यंत सगळ्याची पद्धतशीर बिघाडचीच मालिका आहे. एवढ्या मोठ्या बिघाडाकडून सुधारणेपर्यंतचा मार्ग अवघड आहे.

Although the environment is bad, the environment action plan of the municipality | सगळेच वातावरण बिघडलेले, तरी पालिकेचा वातावरण कृती आराखडा

सगळेच वातावरण बिघडलेले, तरी पालिकेचा वातावरण कृती आराखडा

Next

- रवींद्र मांजरेकर

मुंबईत सुरू असलेली बांधकामे लक्षात घेतली तर शहर-उपनगरात वातावरण बिघाड कृती आराखड्याची अंमलबजावणी वेगात सुरू असल्याचे दिसते. किनारा, मोठे रस्ते, पूल, मेट्रो, भुयारी मेट्रो, राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा लिंक रोड, मुंबईला मुख्य भूमीशी जोडणारा लिंक रोड, भली मोठी निवासी बांधकामे, डम्पिंग ग्राऊंडची भर ही अशी यादी कितीतरी मोठी करता येईल. यात कुठेही वातावरण सुधारणा हे सूत्र नाही. पायाभूत सुविधांचा विकास करून मुंबईची जीवनशैली अधिकाधिक श्रीमंत करण्याचा हा वसा आहे. त्यात मुंबईच्या नैसर्गिक किनाऱ्यापासून ते हवेच्या गुणवत्तेपर्यंत सगळ्याची पद्धतशीर बिघाडचीच मालिका आहे. एवढ्या मोठ्या बिघाडाकडून सुधारणेपर्यंतचा मार्ग अवघड आहे.

पण मुंबईच वैशिष्ट्य हेच की, किमान त्या सुधारणेच्या मार्गावर चालण्याची इच्छाशक्ती या शहराकडे आहे. महापालिकेचा वातावरण कृती आराखडा हे त्या इच्छाशक्तीचे द्योतक आहे. शहराच्या ठेवणीत निर्सगत: ज्या दोषरचना आहेत त्या तर बदलता येणार नाहीत. पण त्यापासून होणारे नुकसान कमी कसे करता येईल, याचा विचार सातत्याने होत राहिला पाहिजे. त्यासाठी हा कृती आराखडा आहे.

पावसाळ्यात मुंबईवर पाणी, दरडी यांचे संकट घोंगावत असते. थोडा जास्त पाऊस पडला तर मुंबईत तब्बल ४०० ठिकाणी हमखास पाणी भरते. ते रेल्वेरुळांवर जाऊन रेल्वेसेवा मान टाकते. मुंबईत भरलेल्या पाण्याचा फटका संपूर्ण महानगर क्षेत्राला बसतो. तोच प्रकार दरडींचा आहे. भर पावसात दरडी कोसळून किमान दोन तरी मोठ्या दुर्घटना होतात. हवेच्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान हा तर, आणखी चिंतेचा विषय. समुद्र, खाडी, तिवरे व मिठागरे या मोकळ्या जागांनी व राष्ट्रीय उद्यानांनी आजवर तग धरल्याने हवेची गुणवत्ता झपाट्याने सुधारतेही पण तोवर तिने बरेच नुकसान करून झालेले असते.

जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेल्या शहरांपैकी मुंबई एक आहे. त्या घनतेमुळे निर्माण होणारे प्रश्न तर आणखी जटील आहेत. त्यावर मात करण्यासाठीही आधी हे शहर वातावरण पूरक,पर्यावरण स्नेही कसे होईल याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच पालिकेने कृती आराखडा तयार केला. पायाभूत सुविधांची उभारणी, शाश्वत वाहतूक, कचरा व्यवस्थापन, नागरी हरितीकरण व जैवविविधता, हवेचा दर्जा, पूरस्थिती व जलस्रोत व्यवस्थापन या सहा गोष्टींवर या आराखड्यात लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यासाठी मुंबई ही सी ४० नेटवर्कचा गेल्यावर्षी सभासद झाली. ३० वर्षात तापमान वाढ आणि पूर स्थितीवर नियंत्रण, दरडींपासून बचाव, किनाऱ्यांचे संरक्षण, हवाई प्रदूषणावर मात या पंचसूत्रीवर भर दिला जाणार आहे. कागदावर हा कृती आराखडा उत्तम दिसतो. त्याची अंमलबजावणी कशी होते, यावर त्याचे आणि मुंबईचेही भवितव्य ठरेल.

महत्त्वाचे
देशातील पहिला वातावरण कृती आराखडा मुंबई महापालिकेने केला.
वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय) इंडिया आणि सी ४० सिटीज नेटवर्क यांनी त्यासाठी तांत्रिक सहाय्य दिले.
सन २०५० पर्यंत नेट-झिरो उत्सर्जन साध्य करणे हे मुंबई वातावरण कृती आराखड्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण आणि वातावरणातून काढून टाकलेले उत्सर्जन या दोहोंमध्ये संतुलन साधणे यास नेट-झिरो म्हणतात.
बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने असुरक्षिततेचे मूल्यमापन,गेल्या सहा महिन्यांतील हरितगृह वायूंच्या स्रोतांची निश्चिती आणि सद्यस्थिती,नैसर्गिक हरित आच्छादनाची सद्यस्थिती याचा आढावा घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
आधारभूत वर्ष २०१९ धरण्यात आले आहे.

Web Title: Although the environment is bad, the environment action plan of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.