विझलो जरी आज मी... सदाभाऊ खोतांनी गझलमधून सांगितला पुढचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:51 PM2022-06-15T12:51:44+5:302022-06-15T12:53:37+5:30
राज्यसभेत जो चमत्कार घडला तोच विधान परिषदेत होईल. आमदारांना घोडे म्हणणं हा त्यांचा अपमान आहे
मुंबई - राज्यसभेच्या निकालात भारतीय जनता पार्टीने ३ जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली. अपक्ष आणि छोट्या मित्रपक्षांची मते फुटल्याने भाजपाला यश मिळेल. मात्र, राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. भाजपाने या निवडणुकीत पक्षाचे ५ तर अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांना उभे केले होते. मात्र, सदाभाऊ खोत यांनी अखेरच्यादिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर, सोशल मीडियातून त्यांच्यावर चांगलीच चर्चा होत होती.
राज्यसभेत जो चमत्कार घडला तोच विधान परिषदेत होईल. आमदारांना घोडे म्हणणं हा त्यांचा अपमान आहे. ज्यांनी त्यांना घोडे म्हणलं त्यांना घोडा लागेल. मला अद्याप कुठलाही निरोप आलेला नाही. काँग्रेसनं जागा मागे घ्यावी की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मात्र, अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे येत्या २० जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुका होणार त्यासाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे, आता सदाभाऊ खोत यांचा राजकीय भविष्य काय, अशी चर्चा घडू लागली.
लढेन नव्या उमेदीने ...... pic.twitter.com/iel4QLW11t
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) June 15, 2022
भाजपने सदाभाऊ खोत यांना अलगदपणे बाहेर काढले. शेतकरी संघटनांचा एकही नेता सध्या सभागृहात नाही, सत्ताधारी किंवा विरोधकांतर्फे विधिमंडळात नाही. त्यामुळे, भाजपने सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर घ्यायला हवं होतं, असाही सूर उमटत आहे. तर, भाजपने सदाभाऊंचा वापर करुन घेतल्याची टिकाही भाजपवर होत आहे. मात्र, आपण शेवटच्या श्वासापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यासमेवत असणार आहे. भाजपने माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि घटकपक्षांचा नेहमीच सन्मान केला. आम्हाला आमदार, मंत्री केलं, असे सदाभाऊ यांनी म्हटलं.
सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन सुरेश भट यांची गझल शेअर केली आहे. विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही
पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, ही गझल सदाभाऊ यांनी शेअर केली आहे. तसेच, लढेन नव्या उमेदीने... असे कॅप्शनही त्यांनी दिले आहे.