ऍल्युमिनियमचा भंगार माल विक्री प्रकरणात व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; चार आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 06:39 PM2023-11-08T18:39:21+5:302023-11-08T18:41:02+5:30

खोटे नांव सांगून फसवणुक करणाऱ्या चार आरोपींच्या टोळीला मांडवीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी अटक केली.

aluminum scrap sale Case, the trader was defrauded of lakhs Four accused arrested in nalasopara | ऍल्युमिनियमचा भंगार माल विक्री प्रकरणात व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; चार आरोपींना अटक

ऍल्युमिनियमचा भंगार माल विक्री प्रकरणात व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; चार आरोपींना अटक

मंगेश कराळे,लोकमत न्यूज नेटवर्क,नालासोपारा:- ऍल्युमिनीअमचा भंगार स्क्रॅप माल विक्री करीता असल्याबाबत तसेच खोटे नांव सांगून फसवणुक करणाऱ्या चार आरोपींच्या टोळीला मांडवीच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.

गुजरातच्या भावनगर येथील व्यापारी जगदीश सरदारमल सुतार (३०) यांचा ॲल्युमिनियम ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. मुंबई येथे असताना त्यांना तीन दलालांनी १२ ऑक्टोंबरला मोबाईलवर त्यांच्याकडे दीडशे टन ॲल्युमिनियम भंगार असल्याचा व्हिडिओ पाठवून विश्वास संपादन केला होता. त्यानंतर प्रति किलो १५७ रुपये दराने भंगार देण्याचे नक्की केले. विरारच्या पारोळ येथील गुरु कृपा रियल गेटर्स कॅप येथे दलाल जनकभाई, तनाझ शेख व  विनय गर्ग यांनी बोलावून कंपनीतील भंगार माल दाखवत सदर माल रमेश चौधरी व खान यांचा असून व्यवहाराप्रमाणे टोकन म्हणून १ लाख रुपये त्या दोघांना दिले. त्यानंतर २२ ऑक्टोबरला रमेश चौधरी व खान यांनी माल घेण्यासाठी बोलावल्यानंतर १५ टन माल वजन करून तो सरदारमल यांनी गाडीत भरल्यावर त्यांना २७ लाख ८७ हजार २३६ रुपयांचे बिल देण्यात आले होते. त्यांनी बँकेतून सदर रक्कम आरोपींच्या खात्यावर भरल्यानंतर आरोपींनी सदरचा माल गुरुकृपा रिअलकाॕन कंपनीचा असल्याचे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवून गेट पास घेऊन येतो असे सांगत तिथून पलायन केले होते. याप्रकरणी आरोपींनी २८ लाख ८७ हजार २४७ रुपयांची फसवणूक केल्याचे लक्षात येताच मांडवी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

तांत्रिक तपासामध्ये आरोपी हे कल्याण शिळफाटा येथे असल्याची माहीती मिळाल्यावर गुन्हे शाखा कल्याण यांच्या मदतीने ३ आरोपींना गाडीसह ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशीत चौथ्या आरोपीचे नाव निष्पन्न करून तो मुंबई वाराणसी ट्रेनने उत्तर प्रदेश येथे जाण्यास निघाला होता. जीआरपीएफच्या मदतीने चालत्या ट्रेनमधुन नाशिक रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी २०१७ पासून कळंबोली, खारघर, तळोजा, धुळे, औरंगाबाद, दिल्ली या ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केले. आरोपी अशोककुमार डलाराम प्रजापती (३५), ओमप्रकाश रामविलास शुक्ला (५०),    धर्मेंद्रकुमार बबन सिंग (४५) आणि साहाबुददीन मोईनुददीन खान (६०) अशी आरोपींची नावे आहेत. 

आरोपी हे प्रत्येक वेळेस स्वताची नावे, मोबाईल नंबर आणि मोबाईल बदलत होते. आरोपींकडुन १५ मोबाईल, २ स्टॅम्प, १ स्टॅम्प पॅड, ४ मोबाईल बॅटरी, वेगवेगळया बँकेचे १० एटीएम कार्ड, ३ चेक बुक, १ मोबाईल चार्जर, ४ सिमकार्ड, घडयाळ, आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच आरोपींच्या ताब्यातील स्विप्ट कार, फिर्यादीची फसवणुक केलेली रोख रक्कम असा एकुण २० लाख २ हजार ३३२ रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयूक्त रामचंद्र देशमूख यांचे मार्गदर्शनाखाली मांडवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफूल्ल वाघ, पोलीस निरिक्षक (गुन्हे) अशोक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांंत पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र फड, लक्ष्मण तरवारे, संभाजी लोधे, गणेश ढमके, अमोल साळुंखे, ढोणे, सोहेल शेख आणि आरपीएफचे सहाय्यक फौजदार काश्मिरी सिंग यांनी केली आहे.

Web Title: aluminum scrap sale Case, the trader was defrauded of lakhs Four accused arrested in nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.