मुंबई : आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या रौप्य महोत्सवी बॅचने लेगसी प्रकल्पासाठी २१ कोटी रुपयांची देणगी संस्थेला दिली आहे. संस्थेतून शिक्षण घेतलेल्याला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी ही मदत देऊ केली आहे. संस्थेतील महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांसाठी ही देणगी वापरली जाईल. त्यातून आयआयटीच्या २०३० मध्ये जागतिक शिक्षण संस्थांच्या क्रमवारीत पहिल्या ५० मध्ये स्थान मिळविण्यास प्रयत्नांना मोठे योगदान मिळणार आहे.
आयआयटी मुंबईचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात या देणगीची घोषणा करण्यात आली. आयआयटी मुंबईच्या १९९९ च्या बॅचने २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेत लेगसी प्रकल्प हाती घेतला आहे. संस्थेला आपण काही देणे लागतो या भावनेतून या माजी विद्यार्थ्यांनी ही मदत देऊ केली आहे. त्यातून संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी आणखी चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
आयआयटी मुंबईने संस्थेतील विविध शैक्षणिक सुविधा आणि संशोधन प्रकल्पांसाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीतूनच आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि सुसज्ज असे वसतिगृह उभारले जात आहे. प्रोजेक्ट एव्हरग्रीन असे या प्रकल्पाला नाव देण्यात आले असून त्याच्या कामांची माहितीही या कार्यक्रमात देण्यात आली.