Join us

मराठीचा टक्का वाढविण्यासाठी नेहमी उपक्रमशील; नावीन्यपूर्ण योजनांवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 2:24 AM

इंग्रजीविषयीचा न्यूनगंड घालवण्यासाठी प्रयोग

- सीमा महांगडे

सत्ताधाऱ्यांची मराठी शिक्षणाविषयीची उदासिनता, वर्षानुवर्षे कमी होत चाललेले शैक्षणिक अनुदान आणि पालकांमध्ये वाढत चाललेले इंग्रजी माध्यमाचे फॅड यामुळे गेल्या काही वर्षांत मुंबईतल्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने रोडावली. अनेक शाळा तर बंद पडल्या.

मराठी माध्यमाच्या शाळांसाठी अत्यंत निराशाजनक स्थिती असताना सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने मात्र एक वेगळाच आदर्श निर्माण केला. आपल्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करून मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ दिली नाही. मुंबईतील मराठी माध्यमाच्या कोणत्याही शाळेपेक्षा डी. एस. हायस्कूलमध्ये मराठी माध्यमासाठी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे, हे विशेष.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते, हा गैरसमज आम्हाला खोडून टाकायचा होता. त्यासाठी डी. एस. हायस्कूलच्या मराठी माध्यमाच्या शाळेत आम्ही अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांचे पालक हे कष्टकरी वर्गातील आहेत.

धारावी परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच शाळेच्या संस्थापकांचे उद्दिष्ट होते. ते गाठण्यात शाळेला यश आले आहे. शंकर महादेवन अकादमीच्या माध्यमातून गायन-वादनाचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे सर्वसामान्य घरांतील विद्यार्थ्यांना हिंदी सिनेमासाठी पार्श्वगायनाची संधी मिळाली. अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये डी. एस. हायस्कूलचे विद्यार्थी गीतगायन करतात. त्यानिमित्ताने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची संधी मिळते आहे़

माजी विद्यार्थ्यांचा सहभाग

डी. एस. हायस्कूलचे आणखी एक वैशिष्ट्य हे की, शाळेच्या प्रत्येक उपक्रमात माजी विद्यार्थ्यांना आवर्जून सहभागी करून घेतले जाते. शाळेचे अध्यक्ष, विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य हे सर्व शाळेचेच माजी विद्यार्थी आहेत. शिवाय, वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून शाळेचे माजी विद्यार्थी शाळेसाठी निधी संकलनाचे विविध उपक्रम राबवत असतात.

२०१३मध्ये शाळेत नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, तेव्हा ही ‘धोक्याची घंटा’ ओळखून आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सायन, धारावी, कुर्ला, अ‍ॅण्टॉप हिल परिसरात शाळेतले ८५ शिक्षक घराघरात गेले. हळदीकुंकू, विविध सण-उत्सवांमध्ये सहभागी होऊन आम्ही पालकांना मराठी माध्यमाचे महत्त्व पटवून दिले, तसेच प्रोजेक्टरद्वारे शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. याचा योग्य तो परिणाम झाला. गेली पाच वर्षे डी. एस. हायस्कूलमध्ये नव्याने प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या सतत वाढत असून साधारणपणे दरवर्षी ४०० विद्यार्थी शाळेत प्रवेश घेत आहेत.- अंकुश महाडिक, मुख्याध्यापक, डी. एस. हायस्कूल.

शाळाप्रवेशासाठी कोणतेही डोनेशन न घेता, तसेच कमी शालेय फी आकारून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अनुदानित शाळा टिकणे ही काळाची गरज आहे. श्रमजीवी-कष्टकरी वर्गातील मुलांना हायफाय इंग्रजी शाळांप्रमाणे मराठी शाळेतही उत्तम शिक्षण व शिक्षणबाह्य उपक्रम देता येणे शक्य आहे, फक्त त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची.- राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल.

लर्निंग डिसॅबिलिटी समुपदेशन केंद्र

शाळेत पूर्ण वेळ मानसोपचारतज्ज्ञ तसेच समुपदेशकाची नेमणूक करण्यात आलेली आहेच. ज्या विद्यार्थ्यांमध्ये लर्निंग डिसॅबिलिटी आहे, त्यांच्या नेमक्या अडचणी ओळखून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चाइल्ड रिएक्ट फाउंडेशनच्या सहकार्याने शाळेत लर्निंग डिसॅबिलिटी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

अत्याधुनिक शाळा

काळाची गरज ओळखत शाळेच्या प्रत्येक वर्गात ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दृक-श्राव्य माध्यमांच्या आधारे विद्यार्थ्यांना शिकवण्यावर शाळेत भर दिला जातो. इतकेच नव्हे तर शाळेच्या संगणक प्रयोगशाळेत तब्बल ६५ संगणक असून संगणक वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र संगणकावर अभ्यास करण्याची संधी मिळते.

टॅग्स :शाळाविद्यार्थीमराठी