Join us

पोलिसांच्या मानवतावादी कामगिरीचा सदैव अभिमान - गृहमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य करत असतात. त्यातून एखादे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य करत असतात. त्यातून एखादे मानवतावादी त्यांच्या हातून घडते त्यावेळेस पोलिसांचा आणि त्यांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी केले.

रेल्वे पोलीस दलातील कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांनी स्वतःचे प्राण धोक्यात टाकून दहिसर रेल्वेस्थानकावर एका ६० वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले. त्याबद्दल त्यांचा सत्कार ज्ञानेश्वरी बंगला येथे करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, पोलीस दलातील शिपाई ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत उत्तम काम करणाऱ्याचा नेहमीच सन्मान केला आहे. कोरोना योद्धे, अद्वितीय काम करणाऱ्याचा सन्मान वेगवेगळ्या माध्यमातून केला आहे. त्यांचे मनोबल वाढवणे, त्यांच्या सुखदुःखाची दखल घेणे हे आपले कर्तव्य, नैतिक जबाबदारी आहे.

-------------------------------

दहिसर स्थानकावरील थरार

गणपत सोळंकी हे दहिसर येथून खारला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे होते. लोकल पकडण्यासाठी फ्लाय ओव्हर ब्रिजचा वापर न करता रुळावर उडी मारून धावत दुसऱ्या बाजूस असलेली लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणारी फास्ट लोकल येत असल्याने ते गांगरून गेले. तिथे कर्तव्यावर असलेले कॉन्स्टेबल सुजीत कुमार यांनी पाहिले. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणपत सोलंकी यांना फलाटावर ओढून त्यांचा जीव वाचविला.