मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसेला शिवसेनेच्या 'दादां'नी दिली महत्वाची माहिती
By मुकेश चव्हाण | Published: October 16, 2020 03:12 PM2020-10-16T15:12:55+5:302020-10-16T15:18:08+5:30
बाळा नांदगावकर यांच्या या विधानंतर आता राज्याचे कृषिमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी दिले उत्तर दिलं आहे.
मुंबई: परतीच्या पावसानं राज्याला दिलेल्या तडाख्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडे मदतीची विनवणी करत आहे. सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडून पडण्याचा सल्ला दिला होता.
बाळा नांदगावकर ट्विट करत म्हणाले की, मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते. बाळा नांदगावकर यांच्या या विधानंतर आता राज्याचे कृषिमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांनी दिले उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 15, 2020
दादा भुसे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, मी राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेत आहे. तसेच एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्रांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.
दरम्यान, परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. पुणे जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने चौघे मरण पावले. सोलापुरात १४ जणांचा बळी गेला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागांत शेतीही पाण्याखाली गेली आहे.
उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामती या ४ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैन्यात केल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनुष्यहानी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टी, वादळी पावसामुळे शेतीचे, पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
अतिवृष्टी, वादळी पावसामुळे शेतीचे, पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 15, 2020
भातपिकाचे नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातपिकाची अक्षरश: नासधूस केली आहे. ५५ हजार हेक्टर पैकी तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्राखालील भात पिकाची नुकसानी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जाहीर केले आहे. तर बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पुराचे पाणी शिरले.
अतिवृष्टीचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. बुधवारी झालेल्या पावसाने भीमा व कृष्णा नदीला पूर आल्याने पंढरपूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ पथकांची मदत घेण्यात आली. राज्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तूर, भात या पिकांनाही अविृष्टीचा तडाखा बसला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक ठिकाणची वाहतूकही बंद करण्यात आली होती. पाऊस अजून सुरूच असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी चार दिवस असाच कोसळण्याची शक्यता आहे.