१०१ दिवसांत ९०,७५३ प्रवाशांचा प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेची अमन लॉज-माथेरान शटलसेवा पुन्हा सुरू झाल्यापासून ९०,७५३ प्रवाशांची आणि ११,८७९ पॅकेजेसची वाहतूक झाली. ४ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या आणि माथेरान या गंतव्यासाठी पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्यामुळे अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या सेवा हळूहळू चारवरून १४ पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. मागील १०१ दिवसांत ९०,७५३ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.
मुंबईतील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. कोरोना अनलॉक कालावधीत पर्यटकांनी येथील नैसर्गिक वातावरणात विश्रांती घेण्यासाठी पसंती दिली. टॉय ट्रेनमधून आल्हाददायक प्रवास करण्यासाठी आणि वीकेण्ड माथेरानमध्ये घालवण्यासाठी या गाड्यांतील १०७० तिकिटे १२ फेब्रुवारी रोजी आरक्षित करण्यात आली. या सेवा पर्यटकांना आरामदायक, स्वस्त आणि जलद वाहतुकीस मदत करतात. या पर्यटनस्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करण्यात रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. अमन लाॅज - माथेरान शटलसेवा वेगात सुरू झाल्याने स्थानिकांना उदरनिर्वाहाची संधी मिळत असून माथेरानची अर्थव्यवस्था सुधारण्यास हातभारही लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
.......................