Join us

बेघर लोकांच्या वास्तव्यामुळे अमर महल जंक्शन विद्रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चेंबूरच्या अमर महल जंक्शन येथे मागील अनेक महिन्यांपासून विविध ठिकाणांहून आलेल्या बेघर नागरिकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चेंबूरच्या अमर महल जंक्शन येथे मागील अनेक महिन्यांपासून विविध ठिकाणांहून आलेल्या बेघर नागरिकांनी आपले बस्तान मांडले आहे. एससीएलआर उड्डाणपूल, पूर्व द्रुतगती मार्ग उड्डाणपूल व टेंभे पूल या तीनही पुलांखाली मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक तळ ठोकून आहेत. हे नागरिक जेवण, स्नान व प्रात:विधी या उड्डाणपुलाखालीच करत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. त्याचप्रमाणे सुशोभीकरण करण्यात आलेल्या लोखंडी ग्रील तसेच कठड्यांवर ही लोकं कपडे वाळत घालत असल्याने हा परिसर संपूर्णतः विद्रूप झालेला आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळेस या परिसरातील पदपथ हे बेघर नागरिक झोपण्यासाठी वापरतात. यामुळे सकाळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना येथे साफसफाई करणे अवघड जाते. मात्र, प्रशासन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. चेंबूर येथील या बेघर नागरिकांसोबत संवाद साधला असता आम्ही ठाणे, नवी मुंबई, मानखुर्द तसेच पुणे परिसरातून येथे आलो असल्याचे सांगण्यात आले. भीक मागून पैसे मिळत असल्याने ते येथून जात नसल्याचे ते म्हणाले.