लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमर नाईक टोळीतील गुंड मनीष शेट्टीला गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या कक्ष-८ने ही कारवाई केली आहे.
शेट्टी हा गुरुवारी विलेपार्ले परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक पिस्तूल आणि तीन जीवंत काडतुसे सापडली. त्याच्याविरुद्ध २००० साली अंधेरीत पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत गुन्हे शाखेच्या कक्ष-११चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जीवंत काडतुसे, दुचाकी, मोबाइल जप्त करण्यात आले. धीरेंद्रप्रताप सत्यदेव सिंग (४२), बन्सीलाल सुंदरलाल जयस्वाल (४६) अशी अटक आरोपींची नावे असून, दोघेही अंधेरी येथील रहिवासी आहेत. त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. आरोपींनी शस्त्र कोणाकडून व कशासाठी घेतले याबाबत अधिक तपास सुरू आहे.
...................................